जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणपूरक किटचे वितरण; मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांना दिल्या शुभेच्छा
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्यांना पर्यावरणपूरक वस्तूंचे किट भेट देत शुभेच्छा दिल्या. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
मुंबई, प्रतिनिधी दि. २ : जागतिक पर्यावरण दिन (५ जून) निमित्त पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने विशेष पर्यावरणपूरक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सदस्यांना हे किट भेट देत जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पर्यावरण संवर्धन आणि दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या विशेष किटमध्ये पर्यावरणपूरक डायरी, पाण्याची बाटली, की-चेन, चिनी मातीचे कप, व्हिजिटिंग कार्ड होल्डर, पेपर होल्डर आदी उपयुक्त वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. दैनंदिन वापरातील या वस्तूंमुळे पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यास मदत होणार असल्याचे पर्यावरण विभागाने सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले. पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करत त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्य शासनाच्या विविध पर्यावरण संवर्धन उपक्रमांबरोबरच नागरिकांनीही पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून शाश्वत विकासाच्या दिशेने योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून पर्यावरण विभागाने नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0