एलपीजी विरहित शहर’ संकल्पनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पुढाकार; घरगुती पाईप गॅस वापर वाढविण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित इंधन व्यवस्थेकडे नेण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) आणि गृहनिर्माण संस्थांच्या संयुक्त बैठकीत घरगुती पाईप गॅस वापर वाढविण्यावर भर देण्यात आला. शहराला भविष्यात ‘एलपीजी विरहित शहर’ बनविण्याचे उद्दिष्ट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

May 22, 2026 - 01:15
 0  4
एलपीजी विरहित शहर’ संकल्पनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पुढाकार; घरगुती पाईप गॅस वापर वाढविण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड महापालिका, एलपीजी विरहित शहर, घरगुती पाईप

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी | दि. २० मे २०२६

पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक इंधन व्यवस्थेकडे नेण्यासाठी महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भविष्यात शहराला देशातील पहिले ‘एलपीजी विरहित शहर’ बनविण्याच्या संकल्पनेला गती देण्यासाठी नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे, एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यावरणपूरक इंधन वापराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) आणि गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहकार विभागाचे अधिकारी तसेच एमएनजीएलचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

घरगुती पाईप गॅस वापर वाढविण्याची गरज

बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केंद्र शासनाच्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराच्या धोरणांचा संदर्भ देत घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

नैसर्गिक वायू हा सुरक्षित, सातत्याने उपलब्ध होणारा आणि आधुनिक जीवनशैलीस पूरक पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील अनेक शहरांमध्ये घरगुती पाईप गॅस यशस्वीपणे कार्यरत असून त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जनजागृती मोहिमेला प्राधान्य

पाईप गॅसबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया मोहीम, माहितीपत्रक वितरण, प्रशिक्षण शिबिरे, सोसायटी भेटी आणि घरोघरी जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

विशेषतः ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये एमएनजीएलचे कनेक्शन उपलब्ध असूनही वापर कमी आहे, त्या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

एमएनजीएलच्या माध्यमातून नागरिकांच्या तांत्रिक अडचणी, शंका आणि कनेक्शन प्रक्रियेसाठी समन्वय अधिकारी नेमण्याचाही प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.

पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय

बैठकीत पाईप गॅस प्रणालीमुळे सिलिंडर साठवणुकीची गरज कमी होते, गॅस पुरवठा अखंडित राहतो, वेळेची बचत होते आणि पर्यावरणीय दृष्टीने हा अधिक प्रभावी पर्याय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे घरगुती पाईप गॅस योजनेची माहिती, सुरक्षिततेचे निकष, ग्राहक सेवा आणि वापराचे फायदे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शहराच्या स्मार्ट आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पाईप गॅस वापर वाढविणे महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0