पीसीयूमध्ये ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ सुरू; फिडेल सॉफ्टटेकसोबत सामंजस्य करार
पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि फिडेल सॉफ्टटेक यांच्यात ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना एआय, डेटा ॲनालिटिक्स आणि बिझनेस इंटेलिजन्स क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षण देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, पुणे (दि. १५ मे २०२६) : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU) विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सहकार्य करत असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ स्थापनेसाठी फिडेल सॉफ्टटेकसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार एआय सक्षम विद्यापीठ बनण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याची माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली.
आकुर्डी येथील ट्रस्ट कार्यालयात पीसीयू आणि फिडेल सॉफ्टटेक कंपनी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी ट्रस्टच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, आयटी आणि आयटीईएस विभाग प्रमुख प्रा. रामकृष्ण वडाली तसेच फिडेल सॉफ्टटेक लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी शांताराम गराडे यांनी सांगितले की, पीसीयूमध्ये लवकरच ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना डेटा ॲनालिटिक्स, डेटा इंजिनिअरिंग आणि बिझनेस इंटेलिजन्स क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.
या प्रशिक्षणामध्ये उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रकल्प, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिके, असाइनमेंट्स, मूल्यांकन आणि प्रमाणपत्रांचा समावेश असेल. यामुळे विद्यार्थ्यांना डेटा इनजेशन, ETL (Extract, Transform, Load) प्रक्रिया, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. रामकृष्ण वडाली यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओएसडी डॉ. योगेश भावसार यांनी मानले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0