पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; 57.73 लाखांचा 83 किलो गांजा जप्त, दोन आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात कारवाई करत 83 किलो 960 ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि स्कॉर्पिओ वाहन असा एकूण 57 लाख 73 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Jun 19, 2026 - 16:54
 0  4
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; 57.73 लाखांचा 83 किलो गांजा जप्त, दोन आरोपी अटकेत
पिंपरी चिंचवड पोलीस, गांजा जप्त, चाकण गुन्हा

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत चाकण परिसरातून तब्बल 83 किलो 960 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गांजासह मोबाईल फोन, रोख रक्कम आणि स्कॉर्पिओ वाहन असा एकूण 57 लाख 73 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती.

18 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडोबा माळ परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय 24, रा. खंडोबा माळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक (वय 24, रा. शिवसाईनगर, कोथरूड, पुणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपींकडून 41 लाख 98 हजार रुपयांचा 83 किलो 960 ग्रॅम गांजा, 75 हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन, 510 रुपये रोख रक्कम आणि 15 लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 57 लाख 73 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(ii)(क) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, अमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी अमली पदार्थ विरोधी पथकाशी 8600002320, पोलीस हेल्पलाईन 112 किंवा मानस हेल्पलाईन 1933 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0