पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन; रोजगार, शिक्षण व सामाजिक समावेशनावर भर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या संयुक्त पुढाकारातून राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रातून रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास व सामाजिक समावेशनासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

Jul 30, 2026 - 03:04
 0  16
पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन; रोजगार, शिक्षण व सामाजिक समावेशनावर भर
तृतीयपंथीय समुपदेशन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. 29 जुलै 2026 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे उत्साहात पार पडले.

या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना मानसिक व सामाजिक समुपदेशन, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी मदत तसेच शिक्षण व स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन ‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख आणि उपाध्यक्षा अर्चना मेंगडे यांनी केले होते. यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, सामाजिक समरसता गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक विलास लांडगे, सामाजिक समरसता गतिविधी प्रांत मंडळाचे सदस्य ॲड. मुकुंद यदमळ तसेच तृतीयपंथीय समाजाच्या प्रतिनिधी डॉ. आम्रपाली मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमहापौर शर्मिलाताई बाबर म्हणाल्या, तृतीयपंथीयांकडे समाजाने दयेच्या नव्हे, तर समानता आणि सन्मानाच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असून, तृतीयपंथी असणे हा कोणताही शाप नसून निसर्गाचा स्वीकार आहे. रोजगाराच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना सक्षम व स्वावलंबी बनविणे आवश्यक आहे.

‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे आणि या उपक्रमाशी संबंधित सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेले हे समुपदेशन केंद्र राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महानगरपालिका विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असून, तृतीयपंथीयांनी या संधींचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहनही उपमहापौर बाबर यांनी केले.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी तृतीयपंथीयांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त केली. समाजाने अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून तृतीयपंथीयांना शिक्षण, रोजगार आणि समान संधी उपलब्ध करून द्याव्यात. महानगरपालिकेने तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेले उपक्रम देशासाठी आदर्श ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा राज्यातील पहिला आणि वेगळा प्रयोग असल्याचे सांगितले. अर्चना मेंगडे यांच्या संकल्पनेला तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी गती दिली. आज अनेक तृतीयपंथीय महानगरपालिकेत विविध पदांवर कार्यरत असून, त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी हे समुपदेशन केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे ते म्हणाले.

तृतीयपंथीयांसाठी भविष्यात आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही कांबळे यांनी दिली.

‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख यांनी सांगितले की, केवळ कायदे करून समानता मिळत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच आवश्यक आहे. महानगरपालिका आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या पुढाकारातून सुरू झालेले हे केंद्र तृतीयपंथीयांना सन्मान, स्वाभिमान, रोजगार आणि समाजात समान स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

हेमंतजी हरहरे यांनी तृतीयपंथीयांच्या समस्या समजून घेण्यासाठी संवेदनशीलता आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांचे जीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांच्या संघर्षाची खरी जाणीव होते. समाजाने त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या भावनेने पाहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

विलास लांडगे यांनी महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

संविधानाने दिलेले समानतेचे अधिकार प्रत्यक्ष समाजात रुजविण्याची गरज असल्याचे ॲड. मुकुंद यदमळ यांनी सांगितले. तृतीयपंथीयांनी केंद्र शासनाच्या SMILE योजना, गरिमा गृह योजना तसेच ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइट्स) कायदा, 2019 अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध योजना व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

समाजविकास विभागाचे तत्कालीन अधिकारी सुहास बहादरपुरे यांनी चार वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याची कल्पना कशी साकार झाली, याचा प्रवास उलगडला.

ते म्हणाले की, महानगरपालिकेकडे अनाथ, दिव्यांग, महिला, मागासवर्गीय आणि इतर घटकांसाठी विविध योजना होत्या; मात्र तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र योजना नव्हती. अनेक तृतीयपंथीयांना समाज, कुटुंब आणि नातेवाईकांकडून नाकारले जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक होते.

सुरुवातीला तृतीयपंथीयांच्या गुरूंशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर अर्चना मेंगडे यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते उघडणे यांसारख्या मूलभूत कागदपत्रांसाठी मदत केली. पुढे अनेक तृतीयपंथीयांना महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

“पहिल्यांदा वर्दी अंगावर चढवताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. अनेक वर्षांपासून संपर्क तुटलेल्या आई-वडिलांनी महानगरपालिकेत येऊन आपल्या मुलांना भेट दिली. हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता,” असे बहादरपुरे यांनी सांगितले.

तृतीयपंथीय समाजाच्या प्रतिनिधी डॉ. आम्रपाली मोहिते यांनी भावनिक भाषणातून समाजाच्या दुटप्पी मानसिकतेवर भाष्य केले. “आम्ही भारताचे नागरिक आहोत. संविधानाने आम्हाला समानतेचा अधिकार दिला आहे; तरीही आम्हाला समाजात उपेक्षित जीवन जगावे लागते. लिपस्टिक आणि मेकअपच्या मागे आमच्या वेदना कोणी पाहत नाही,” असे त्यांनी सांगितले.

आसिफ शेख आणि अर्चना मेंगडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी या दोघांनी तृतीयपंथीयांना सन्मानाने जगण्याची नवी आशा दिल्याची भावना व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या तृतीयपंथीय शिक्षिका किरण वाघ यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “मी तृतीयपंथी असल्याचा मला अभिमान आहे. शिक्षणामुळे मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले. प्रत्येक तृतीयपंथीयाने शिक्षण घेऊन स्वतःचे अधिकार स्वतः मिळवले पाहिजेत,” असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला माधुरी वैरागे, उपेंद्र धाकपाडे, अवनी, अक्षय, मनस्वी, संघप्पा यांच्यासह तृतीयपंथीय समाजातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना आवश्यक मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी, शासकीय योजनांचा लाभ आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक आधार मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्य

वरांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.