प्रशांत दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’च्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि निर्माते प्रशांत दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’च्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Jul 11, 2026 - 01:16
 0  12
प्रशांत दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’च्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती
प्रशांत दामले, बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान, रितू तावडे,

मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू अभिनेते, गायक, निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पुरुषोत्तम दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त (Managing Trustee) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी (१० जुलै २०२६) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आयोजित कार्यक्रमात प्रशांत दामले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशांत दामले यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.

गाण्यापासून जागतिक विक्रमापर्यंतचा प्रवास

मुंबईत जन्मलेल्या प्रशांत दामले यांना शालेय जीवनापासूनच संगीताची आवड होती. महाविद्यालयीन काळात अभिनय आणि नाट्यकलेची ओढ निर्माण झाली. १९७८ ते १९८३ या कालावधीत त्यांनी समांतर रंगभूमीवर काम करत अभिनयाचा मजबूत पाया रचला.

१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टूरटूर’ या व्यावसायिक नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आजपर्यंत त्यांनी ३६ विविध नाटकांमधून १३,५३८ हून अधिक प्रयोग करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून त्यांच्या या कामगिरीची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये चार वेळा झाली आहे.

कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदान

प्रशांत दामले यांनी अभिनेता, गायक, निर्माता आणि सूत्रसंचालक म्हणूनही विशेष ओळख निर्माण केली आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना केंद्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' प्राप्त झाला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

प्रतिष्ठानच्या कामाला मिळणार नवी दिशा

प्रशांत दामले यांच्यासारख्या अनुभवी, अभ्यासू आणि लोकप्रिय कलावंताच्या नेतृत्वामुळे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या कामाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले तसेच प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.