खाजगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट; ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचा आंदोलनाचा इशारा

खाजगी शाळांकडून पुस्तके आणि गणवेश खरेदीसाठी पालकांवर सक्ती केली जात असून आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने केला आहे. तत्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Apr 29, 2026 - 19:45
 0  10
खाजगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट; ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचा आंदोलनाचा इशारा
खाजगी शाळा पालकांची लूट, नाशिक शिक्षण बातम्या,

नाशिक : खाजगी शाळांकडून पुस्तके आणि गणवेश खरेदीसाठी पालकांवर सक्ती केली जात असून या माध्यमातून आर्थिक शोषण सुरू असल्याचा आरोप ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन (GDKF) ने केला आहे. या प्रकरणी फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन सोळंके यांनी शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

पुस्तकांच्या संचासाठी ६,३६४ रुपयांची आकारणी

निवेदनानुसार, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता तिसरी (ICSE बोर्ड) च्या पुस्तकांचा संच तब्बल ६,३६४ रुपये दराने विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही पुस्तके केवळ शाळेच्या आवारातून किंवा शाळेने ठरवून दिलेल्या विशिष्ट ठिकाणाहूनच खरेदी करणे पालकांना बंधनकारक केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बाजारात ही पुस्तके इतरत्र उपलब्ध नसल्याने शाळांची मक्तेदारी वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

फाउंडेशनच्या प्रमुख मागण्या

ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत:

पालकांवरील पुस्तके व गणवेश खरेदीची सक्ती तात्काळ थांबवावी

State Board, CBSE, ICSE यांसह सर्व मंडळांची पुस्तके प्रमुख दुकानांमध्ये उपलब्ध करावीत

खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांच्या दरांवर नियंत्रण ठेवून कमाल विक्री किंमत (MRP) निश्चित करावी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी

आंदोलनाचा इशारा

“ग्राहकांना गरजेच्या वस्तू खुल्या बाजारातून खरेदी करण्याचा मूलभूत अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने दिला आहे. शाळा हे विद्येचे मंदिर असून तेथे चाललेली व्यावसायिक लूट थांबवणे गरजेचे आहे,” असे मत नितिन सोळंके यांनी व्यक्त केले.

प्रशासनाने त्वरित कठोर पावले न उचलल्यास पालकांना सोबत घेऊन राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1