विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली; आधी काम केले, मग मतं मागितली – खा. संजय राऊत
पिंपरी चिंचवड येथे ‘उद्धव श्री पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यात खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत निवडणुकीच्या वेळीच लाडकी बहीण योजनेची आठवण झाल्याची टीका केली. यावेळी सामाजिक, वैद्यकीय, क्रीडा, कला व अन्य क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पिंपरी, पुणे, दि. २१ ऑगस्ट २०२६ : कलाकार, क्रीडापटू आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय आणि समाजाचा सन्मान मिळाला पाहिजे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींच्या पाठीशी उभे राहून त्यांचा सन्मान केला. त्याच विचाराने उद्धव ठाकरे जबाबदारीने काम करीत आहेत. शिवसेनेने आधी काम केले आणि त्यानंतर मतं मागितली; मात्र विरोधकांना निवडणुकीच्या वेळीच ‘लाडकी बहीण’ आठवली, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘उद्धव श्री पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिरांची चळवळ सुरू केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे काम करीत आहेत. कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झाले असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे जबाबदारी घेतली. त्यांच्या कार्याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा केवळ पुरस्कार नसून सामाजिक कार्याचा सन्मान आहे. ‘जिथे संकट, तिथे शिवसेना’ या भूमिकेतून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना काम करीत आली आहे. शिवसेनेने जनतेसाठी आधी काम केले आणि त्यानंतर मतं मागितली. याउलट विरोधकांना निवडणुकीच्या काळातच ‘लाडकी बहीण’ योजनेची आठवण झाली, असा टोला त्यांनी लगावला.
प्रामाणिक माणसांना सन्मानाची गरज – विनायक राऊत
माजी खासदार विनायक राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, राजकारणात पुढे पुढे करणाऱ्यांचे दिवस असल्याची टीका केली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या पदरी मात्र उपेक्षा पडत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ३६ हजार उद्योग बंद पडल्याचा दावा करत त्यांनी हा प्रकार महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा असल्याचे म्हटले. उद्योजकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना त्रास दिला जात असून महाराष्ट्रात उद्योगांवर सर्वाधिक कर लावला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करणारे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा पूर्ण विश्वास असल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले.
सामाजिक कार्याचा सन्मान – चेतन पवार
पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना ‘उद्धव श्री पुरस्कार’ हा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सामाजिक योगदानाचा सन्मान असल्याचे सांगितले. कोरोना महामारीसारख्या जोखमीच्या काळातही अनेकांनी पुढे येऊन आपले कर्तव्य बजावले. अशा कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
‘उद्धव श्री पुरस्कार २०२६’ अंतर्गत वैद्यकीय, साहित्य, कामगार, सामाजिक, क्रीडा, कृषी आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये डॉ. संतोष लाटकर, डॉ. रोहन काटे यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी, प्रा. तुकाराम पाटील यांना साहित्य क्षेत्रासाठी, काशिनाथ नखाते यांना कामगार क्षेत्रासाठी, प्रीती वैद्य व भाग्यश्री मोरे यांना सामाजिक कार्यासाठी, चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी, पै. योगेश्वर तापकीर, शौर्या भरणे व रियाज शेख यांना क्रीडा क्षेत्रासाठी, रामदास काटे यांना कृषी क्षेत्रासाठी आणि डॉ. संजीव कुमार पाटील यांना कला क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दलही भाग्यश्री मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
युवक-युवतींचा शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड आणि पिंपळे निलख परिसरातील युवक-युवतींनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार संजय राऊत यांनी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या युवक-युवतींचे स्वागत केले.
यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, रोमी संधू, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख लतिकाताई पाष्टे, सुशीला पवार, विजय सुळे, गजानन थरकुडे, सुनील सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, ज्योती भावे, सचिन मगर, नितीन घोलप आदी उपस्थित होते.
चौकट : फुटीर गट न्यायालयात युक्तिवाद करू शकत नाही; फक्त म्हणणे मांडू शकतो – संजय राऊत
शिवसेना पक्षफुटीप्रकरणी आमच्या पक्षाचा न्यायालयातील युक्तिवाद संपला आहे. आता फुटीर गट सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करू शकत नाही, ते केवळ आपले म्हणणे मांडू शकतात, असा दावा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
फुटीर गटातील नेते सुरतला कसे गेले, त्यानंतर गुवाहाटी आणि गोव्याला कसे गेले, या संपूर्ण घटनाक्रमाबाबत ते न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडू शकतात; मात्र त्याला युक्तिवाद म्हणता येणार नाही, अशी बोचरी टीकाही राऊत यांनी केली.
शिवसेना पक्षफुटीच्या प्रकरणातील न्यायालयीन लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0