20 वर्षांपासून फरार असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला सांताक्रूझ पोलिसांकडून अटक
सन 2003 मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आणि तब्बल 20 वर्षांहून अधिक काळ फरार असलेल्या सलीम मोहम्मद नबी शेख उर्फ पप्पू (वय 55) याला सांताक्रूझ पोलिसांच्या तडीपार पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चुनाभट्टी परिसरातून अटक केली. आरोपीविरोधात न्यायालयाने जाहीरनामा काढला होता. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : सन 2003 मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सांताक्रूझ पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. सलीम मोहम्मद नबी शेख उर्फ पप्पू (वय 55 वर्षे), रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, चुनाभट्टी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर क्रमांक 298/2003 अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम 170 आणि 420 अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, 71 वे न्यायालय, बांद्रा (पूर्व), मुंबई येथे सुरू होती. मात्र आरोपी न्यायालयीन सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याच्या विरोधात जाहीरनामा क्रमांक 308/2025 दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केला होता.
दीर्घकाळापासून पोलीस व न्यायालयाच्या नजरेआड राहून फरार असलेल्या आरोपीचा शोध सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाकडून सुरू होता. याच दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चुनाभट्टी परिसरात आपली ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार दिनांक 20 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची ओळख निश्चित केल्यानंतर त्याला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार पथकातील सहाय्यक फौजदार आव्हाड, पोलीस हवालदार अजय गोडसे आणि पोलीस शिपाई प्रशांत मखरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0