अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी मुंबईच्या जपानच्या वाणिज्यदूत; मराठीही शिकणार

जपानच्या नव्या वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी राज्यपालांची भेट घेत भारत-जपान शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला असून लवकरच मराठी भाषा शिकण्याचा निर्धार व्यक्त केला.

May 4, 2026 - 22:50
 0  8
अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी मुंबईच्या जपानच्या वाणिज्यदूत; मराठीही शिकणार
जपानच्या नव्या वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी राज्यपालांची भेट

मुंबई : जपानच्या मुंबईतील नव्याने नियुक्त वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची शिष्टाचार भेट घेत भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे, अस्खलित हिंदी बोलणाऱ्या हितोमी यांनी लवकरच मराठी भाषा शिकण्याची इच्छाही व्यक्त केली.

मुंबईतील लोक भवन येथे झालेल्या या भेटीत शिक्षण, संस्कृती आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. इलाहाबाद येथे हिंदीचे शिक्षण घेतलेल्या हितोमी यांनी भारतात दोन वर्षे शिक्षण घेतले असून, नवी दिल्लीतील जपान दूतावासात सुमारे साडेनऊ वर्षे त्यांनी कार्य केले आहे.

मराठी भाषा शिकण्याबाबत बोलताना हितोमी म्हणाल्या की, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांची लिपी देवनागरी असल्याने मराठी शिकणे त्यांच्यासाठी सोपे जाईल. तसेच ओसाका विद्यापीठातील प्रा. अकिरा ताकाहाशी यांनी तयार केलेल्या मराठी-जपानी शब्दकोशाचीही त्यांनी माहिती दिली.

भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये मेट्रो, बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेसवे प्रकल्पांमध्ये सुरू असलेले सहकार्य शिक्षण, क्रीडा आणि संस्कृती क्षेत्रातही वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी हितोमी यांचे स्वागत करत महाराष्ट्रातील विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जपानी भाषा विभाग कार्यरत असून नागपूरमध्येही नव्याने विभाग सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच, भारत-जपान संबंधांच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त करत, मराठी आणि जपानी साहित्याचे परस्पर भाषांतर वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. उत्कृष्ट अनुवादकांना सन्मानित करण्यासाठी विशेष योजना राबवण्याचाही त्यांनी सुझाव दिला.

या बैठकीला जपानच्या मुंबईतील काउन्सल शिमादा मेगुमी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि सहसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.

मुंबईतील जपानी वाणिज्यदूतपदी यागी कोजी यांच्या बदलीनंतर सातो हितोमी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.