मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणादरम्यान बनावट WhatsApp संदेशांपासून सावध राहा; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) प्रक्रियेदरम्यान मतदारांना बनावट WhatsApp संदेश पाठवून फसवणुकीचे प्रयत्न होत असल्याने कोणतेही शुल्क भरू नये, वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आवाहन केले आहे.

Jul 17, 2026 - 23:52
 0  5
मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणादरम्यान बनावट WhatsApp संदेशांपासून सावध राहा; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन
SIR 2026, मतदार यादी, विशेष सखोल पुनरीक्षण, बनावट WhatsApp संदेश,

मुंबई प्रतिनिधी |  नरेश शिंदे 

मुंबई : बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर व उपनगरे) सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) 2026 प्रक्रियेदरम्यान मतदारांना व्हॉट्सअॅपवर बनावट आणि दिशाभूल करणारे संदेश पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरभेटी देऊन मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाची प्रक्रिया राबवत आहेत. याच कालावधीत काही मतदारांना व्हॉट्सअॅपवर बनावट संदेश पाठवून त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असून, एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात आहे.

एस. चोक्कलिंगम यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, भारत निवडणूक आयोग कोणत्याही मतदार सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. त्यामुळे अशा बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नये, त्यांना प्रतिसाद देऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये.

तसेच कोणत्याही व्यक्तीला बँक खात्याची माहिती, एटीएम तपशील, ओटीपी किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. मतदारांनी केवळ भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

मतदारांना कोणतीही शंका असल्यास 1950 या मतदार हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी जागरूक राहून फसव्या संदेशांपासून स्वतःचे संरक्षण करावे आणि केवळ अधिकृत माध्यमातून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.