त्र्यंबकेश्वर दरोडा व अपहरण प्रकरणाचा अवघ्या दोन तासांत छडा; ११ पैकी १० आरोपी अटकेत, सर्व मुद्देमाल जप्त

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वीज उपकेंद्राच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या दरोडा व अपहरण प्रकरणाचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावला. ११ पैकी १० आरोपींना अटक करून ट्रॅक्टरसह चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Jul 27, 2026 - 22:52
 0  9
त्र्यंबकेश्वर दरोडा व अपहरण प्रकरणाचा अवघ्या दोन तासांत छडा; ११ पैकी १० आरोपी अटकेत, सर्व मुद्देमाल जप्त
त्र्यंबकेश्वर दरोडा व अपहरण प्रकरणाचा अवघ्या दोन तासांत छडा; ११ पैकी १० आरोपी अटकेत

नाशिक ब्यूरो 

नाशिक, दि. 27 : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणीच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या दरोडा व अपहरणाच्या गंभीर गुन्ह्याचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणात ११ पैकी १० आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या सबस्टेशनच्या कामावर कार्यरत असलेल्या कामगारांना तलवार आणि पिस्तूलाचा धाक दाखवून आरोपींनी दरोडा टाकला. यावेळी कामगारांच्या निवासस्थानाजवळील खंडेश्वर, वायर तसेच वीज कामासाठी वापरण्यात येणारे मौल्यवान साहित्य लुटून नेण्यात आले. याशिवाय दोन कामगारांचे अपहरण करण्यात आले आणि घटनास्थळावरील ट्रॅक्टरही चोरून नेण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच 112 आपत्कालीन सेवा क्रमांकावर पोलिसांना कॉल प्राप्त झाला. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत विविध पथके रवाना केली. तांत्रिक माहिती आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एक ते दोन तासांत गुन्ह्याचा छडा लावून १० आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर, मोबाईल फोन तसेच इतर सर्व चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी घटनास्थळाची रेकी केल्याचेही उघड झाले आहे.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी इस्माईल नावाच्या आरोपीविरुद्ध यापूर्वी सिन्नर पोलीस ठाण्यात वायर चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेले बहुतेक आरोपी वाडीवरे आणि अंबड परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. उर्वरित आरोपींविरुद्ध दरोडा, अपहरण आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहेत.

या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची सज्जता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1