धम्मलिपी, लेणी आणि पालिभाषा संवर्धनाची जबाबदारी भारतीयांची : गार्गी निळू फुले
नाशिकमध्ये पहिले ‘विश्व धम्मलिपी-लेणी-पालिभाषा साहित्य संगीति-संमेलन’ उत्साहात संपन्न. धम्मलिपी, बौद्ध लेणी आणि पालिभाषेच्या संवर्धनासाठी १४ ठराव मंजूर.
नाशिक ब्यूरो:
नाशिक : तथागत बुद्धांनी जगाला दिलेली विचार-तत्त्वांची देणगी, धम्मलिपी, सम्राट अशोककालीन स्तूप, लेणी व गुंफा तसेच बुद्धांची मातृभाषा असलेल्या पालिभाषेचा समृद्ध वारसा जतन, संवर्धित आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भारतीयांसह जगातील प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या गार्गी निळू फुले यांनी केले.
सर जेम्स प्रिन्सेप यांच्या २२७ व्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या धम्मलिपी दिनाचे औचित्य तसेच लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त नाशिकमध्ये पहिले ‘विश्व धम्मलिपी-लेणी-पालिभाषा साहित्य संगीति-संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून गार्गी निळू फुले बोलत होत्या.
दान पारमिता-लोककवी डॉ. वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक, महाराष्ट्र, भारत यांच्या वतीने आयोजित या संमेलनाला देश-विदेशातील बौद्ध धम्म अभ्यासक, साहित्यिक, विचारवंत, संशोधक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नव्या पिढीने ऐतिहासिक वारसा जपण्याचे आवाहन
गार्गी निळू फुले म्हणाल्या की, बुद्ध विचार आणि तत्त्वज्ञान हा मानवतेला मिळालेला अमूल्य वारसा आहे. धम्मलिपी, बौद्ध लेणी, स्तूप, गुंफा आणि पालिभाषा यांचा अभ्यास केवळ इतिहास म्हणून न करता त्यांच्या साहित्यिक आणि मानवी मूल्यांचा नव्या पिढीने अभ्यास करणे गरजेचे आहे.
हा वारसा केवळ जतन करण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याचे मनन, चिंतन आणि आचरण झाले पाहिजे. मानवी जीवन अधिक समृद्ध करणाऱ्या या ज्ञानपरंपरेच्या शिक्षण-प्रशिक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोतीलाल आलमचंद्र संमेलनाध्यक्ष
सुप्रसिद्ध बौद्ध साहित्यिक व विचारवंत मोतीलाल आलमचंद्र यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले. सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेता व पार्श्वगायक नंदेश उमप, पत्रकार कुणाल कांबळे, रवींद्र वामन कर्डक, बौद्ध साहित्य अभ्यासक व स्वागताध्यक्ष अतुल भोसेकर, संमेलनाचे मुख्य प्रवर्तक, निमंत्रक व संकल्पक प्रा. शरद शेजवळ आणि संयोजक-निमंत्रक सुनील खरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. शरद विमल दिनकर शेजवळ आणि सुनील खरे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला.
नाशिकला साहित्यनगरीचे स्वरूप
संमेलनाच्या निमित्ताने नाशिक नगरीला ‘महाकवी अश्वघोष साहित्यनगरी नाशिक’, संमेलन परिसराला ‘लोककवी डॉ. वामनदादा कर्डक साहित्य परिसर’, तर विचारपीठाला ‘सर प्रिन्सेप सभागृह / चक्रवर्ती सम्राट अशोक-बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारपीठ’ असे नामकरण करण्यात आले.
चीनचे प्रा. लेले हाँग आणि श्रीलंकेचे पथुम रणशिंगर यांनी दृकश्राव्य माध्यमातून संमेलनात सहभाग नोंदविला.
विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मंथन
संमेलनात धम्मलिपी, बौद्ध लेणी आणि पालिभाषेच्या इतिहास, वर्तमानातील उपयुक्तता तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचा संबंध यावर विविध सत्रांमध्ये विचारमंथन करण्यात आले.
‘धम्मलिपी, लेणी, पालिभाषा आणि आधुनिक भाषा’ या विषयावर संमेलनाध्यक्ष मोतीलाल आलमचंद्र यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. ‘पालिभाषेची आधुनिक काळातील गरज व महत्त्व’ या विषयावर विजय मोहिते यांनी विचार व्यक्त केले.
तर ‘प्राचीन बौद्ध धम्म सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक AI तंत्रज्ञान’ या विषयावर आशा उके-यशवंते यांनी आपले विचार मांडले.
प्रदर्शन, साहित्य दालन आणि सांस्कृतिक उपक्रम
संमेलनाच्या निमित्ताने धम्मलिपी, लेणी आणि पालिभाषेचा अभ्यास करणाऱ्या साहित्यिकांच्या लेखांचा संग्रह असलेली ‘त्रिरश्मी डिजिटल स्मरणिका’ सादर करण्यात आली.
तसेच ‘भिक्षु आनंद-उपाली चित्रदालन’ या नावाने चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. काव्य, गीत आणि गझल स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले.
लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या साहित्याबरोबरच धम्मकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ‘धम्मरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुस्तक आणि ग्रंथ विक्रीसाठी ‘लोककवी डॉ. वामनदादा कर्डक व साहित्यिक बाबुराव बागुल ग्रंथ विक्री व प्रदर्शन दालन’ उभारण्यात आले होते.
‘बुद्ध म्हणजे युद्ध नव्हे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
संमेलनाच्या समारोप सत्रात कवी ८ जेस डेझा (चंद्रपूर) यांच्या ‘बुद्ध म्हणजे युद्ध नव्हे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बीजभाषण, धम्मरत्न पुरस्कार वितरण आणि अध्यक्षीय भाषणाचे आयोजन करण्यात आले.
समारोप सत्राचे अध्यक्षपद अतुल भोसेकर यांनी भूषविले, तर संमेलनाध्यक्ष मोतीलाल आलमचंद्र यांनी अध्यक्षीय भाषण केले.
धम्मलिपी, पालिभाषा आणि लेणी संवर्धनासाठी १४ ठराव
संमेलनात धम्मलिपी, पालिभाषा, बौद्ध लेणी आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी विविध मागण्यांचे १४ ठराव मांडून ते सर्वानुमते मंजूर करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
या ठरावांमध्ये भारतातील तसेच जागतिक पातळीवरील राज्य व केंद्र सरकारांच्या माध्यमातून पाली व बौद्ध धम्म विद्यापीठांची स्थापना, धम्मलिपीसाठी ‘ब्राह्मी लिपी’ऐवजी ‘धम्मलिपी’ हा शब्दप्रयोग करण्याची मागणी, प्राचीन लेणी व शिलालेखांची माहिती दर्शनी फलकांवर उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी QR कोडची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे.
लेणी संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संस्कृतप्रमाणे पालिभाषा हा वैकल्पिक विषय उपलब्ध करून देणे आणि पालिभाषेतील उच्च शिक्षित उमेदवारांना शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय बौद्ध विहार व लेणी यांना बौद्ध धार्मिक तसेच शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करणे, प्रशिक्षित लेणी मार्गदर्शकांची नियुक्ती करणे, पर्यटक व अभ्यासकांसाठी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देणे, लेणी परिसरात प्रथमोपचार किट आणि स्ट्रेचरची सुविधा ठेवणे यासंबंधीही ठराव करण्यात आले.
UPSC आणि MPSCमध्ये पालिभाषेचा पुन्हा समावेश करावा तसेच भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये पालिभाषेचा समावेश करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणीही संमेलनातून करण्यात आली.
देश-विदेशातील अभ्यासकांचा सहभाग
नाशिकमध्ये पार पडलेल्या या पहिल्या विश्व धम्मलिपी-लेणी-पालिभाषा साहित्य संमेलनाला देश-विदेशातील बौद्ध धम्म अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सामाजिक व बौद्ध धम्म कार्यकर्ते तसेच धम्मलिपी, लेणी आणि पालिभाषेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी सहभाग घेतला.
लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या साहित्यावर पीएच.डी. संशोधन करणाऱ्या मान्यवर संशोधकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
आयोजकांचे योगदान
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवर्तक-निमंत्रक प्रा. शरद विमल दिनकर शेजवळ, संयोजक-निमंत्रक सुनील खरे, कार्यवाह संतोष आंभोरे, संयोजक रुपाली गायकवाड, अर्चना वाघमारे, अलका ग. वासनिक, ज्ञानेश्वर सोनवणे, ज्योती खैरमोडे, किरण सोंडे, निरझरा रामटेके, पौर्णिमा कट्यारे, आकाश हजारे, विकास शिंदे, राहुल बागले, राजू पगारे, रुपाली पगारे, शांता मुलगे, श्वेता पवार, सोनाली निसर्गन, वैभव जाधव, वंदना नाईक, विजया उमाळे, वर्षा भोसले कदम, युवराज वाघ, यशवंत दाणी, मयुरी दामोदर, सुनंदा साबळे, सुशिला गजभिये, मिलिंद तेलुरे, दीक्षा नाईक, मैत्री मिसाळ, संध्या निकाळजे, सुजाता मोरे, संतोष जाधव, वनिता पगारे सरोदे, सचिन शिराळ, अतुल डांगळे, दीपक शिंदे, अखिल गांगुडे, अभय लोखंडे, सुरेश खळे आणि सुर्वेकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले, तर आभार व ठरावांचे वाचन संतोष आंभोरे यांनी केले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0