भारत टेक्स 2026’मध्ये महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन; उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणुकीचे मंत्री संजय सावकारे यांचे आवाहन
नवी दिल्लीतील ‘भारत टेक्स 2026’ या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शनात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून सहभागी असून राज्याच्या वस्त्रोद्योगातील परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या संधींचे प्रभावी प्रदर्शन या दालनातून करण्यात आले.
नवी दिल्ली | प्रतिनिधी नरेश शिंदे
देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स 2026’ मध्ये महाराष्ट्राने भागीदार राज्य (Partner State) म्हणून दमदार उपस्थिती नोंदवली आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित या प्रदर्शनात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि गुंतवणुकीच्या संधींचे दर्शन या दालनातून घडत आहे.
उद्घाटनप्रसंगी वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त श्वेता सिंघल, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम विभागाचे उपसचिव तुषार पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दालन राज्याच्या पारंपरिक वस्त्रोद्योग वारशासह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम सादर करणारे आहे. पारंपरिक तंतूपासून अत्याधुनिक वस्त्रोद्योग तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास या दालनात मांडण्यात आला असून, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही धोरणांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, 2017 ते 2023 या वस्त्रोद्योग धोरणाला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य शासनाने 2023 ते 2028 या कालावधीसाठी अधिक व्यापक आणि आकर्षक वस्त्रोद्योग धोरण लागू केले आहे. या धोरणांतर्गत विविध झोननुसार भांडवली अनुदान, वीजदर सवलत, यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक सहाय्य, करसवलती आणि इतर अनेक प्रोत्साहनपर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन वस्त्रोद्योग उभारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून देश-विदेशातील उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.
याच कार्यक्रमात वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आधुनिक डिजिटल व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आलेल्या ‘टेक्सटाइल डॅडी’ या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. उत्पादक, पुरवठादार, खरेदीदार आणि उद्योग क्षेत्रातील विविध घटकांना एकाच डिजिटल मंचावर जोडून व्यवसाय सुलभ करणे, नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि उद्योगांना नवीन संधी निर्माण करून देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. वस्त्रोद्योगाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
यानंतर मंत्री सावकारे यांनी महाराष्ट्र दालनातील विविध स्टॉल्सची पाहणी केली. महाराष्ट्र हँडलूम कॉर्पोरेशन, महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन, रेशीम संचालनालय, उद्योग विभाग आणि अमरावती येथील पीएम मित्र पार्क या पाच प्रमुख किऑस्कद्वारे राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची ताकद सादर करण्यात आली.
या दालनात महाराष्ट्राची पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने विशेष आकर्षण ठरली आहेत. पैठणी, करवत काठी, हिमरू, खण साड्या, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू टॉवेल्स, टेरी टॉवेल्स तसेच जीआय टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या उत्पादनांना देश-विदेशातील खरेदीदार, निर्यातदार आणि उद्योग प्रतिनिधींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, 14 जुलै रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांच्या उपस्थितीत ‘भारत टेक्स 2026’चे उद्घाटन झाले. या जागतिक प्रदर्शनात 130 हून अधिक देशांतील सुमारे 6,000 आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि 1.30 लाखांहून अधिक व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी झाले असून, भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी हे प्रदर्शन जागतिक स्तरावरील महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0