मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बाल कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य; राज्यातील २०० बालरुग्णांना लाभ
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, बीपीसीएल आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्या त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल बाल कर्करोग रुग्णांना निदानासाठी आर्थिक सहाय्य. पहिल्या दोन महिन्यांत ५९ बालरुग्णांना ५० लाख रुपयांची मदत.
मुंबई | प्रतिनिधी : देवानंद शिंदे
आर्थिक अडचणींमुळे कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचार सुरू होण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत राज्यातील बाल कर्करोग रुग्णांसाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्या त्रिपक्षीय करारातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, राज्यातील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल बालरुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालरुग्णांना कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक तसेच खर्चिक वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आर्थिक कारणांमुळे निदान प्रक्रियेत होणारा विलंब टाळून वेळेत उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.
पहिल्या दोन महिन्यांत ५९ बालरुग्णांना ५० लाखांची मदत
योजनेच्या प्रारंभीच्या दोन महिन्यांतच ५९ बालरुग्णांना सुमारे ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. या सर्व बालरुग्णांचे कर्करोग निदान टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून, बालरुग्णांवर योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होत आहे.
महागड्या निदान चाचण्यांसाठी मोठा आधार
कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्या अत्यंत खर्चिक असल्याने अनेक कुटुंबांना उपचार प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रथमच निदान प्रक्रियेसाठी स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०० बालरुग्णांना मिळणार लाभ
या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालरुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, त्यापैकी आतापर्यंत ५९ बालरुग्णांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
या योजनेबाबत अधिक माहिती किंवा सहाय्यासाठी गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक १८००१२३२२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1