डॉ. वसंतराव पवार रुग्णालयातील घटनेबाबत स्पष्टीकरण; लिफ्ट नव्हे तर हॉइस्ट ट्रॉली असल्याचा दावा

नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. संबंधित यंत्रणा लिफ्ट नसून उपकरणे वाहून नेणारी हॉइस्ट ट्रॉली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Apr 29, 2026 - 19:37
 0  2
डॉ. वसंतराव पवार रुग्णालयातील घटनेबाबत स्पष्टीकरण; लिफ्ट नव्हे तर हॉइस्ट ट्रॉली असल्याचा दावा
नाशिक रुग्णालय घटना, डॉ वसंतराव पवार रुग्णालय, हॉइस्ट ट्रॉली,

नाशिक ब्यूरो 

नाशिक : डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालयात २७ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या घटनेबाबत विविध प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्षात घडलेली घटना आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये मोठी तफावत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, घटनेत ज्या लिफ्टचा उल्लेख केला जात आहे, ती प्रत्यक्षात लिफ्ट नसून शस्त्रक्रियेदरम्यान लागणाऱ्या उपकरणांचे ड्रम वाहून नेण्यासाठी वापरली जाणारी हॉइस्ट ट्रॉली आहे.

तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा

शासकीय विद्युत अभियंत्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित ट्रॉली कोसळलेली नसून त्यामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आलेला नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.

महिला कर्मचारी जखमी

या घटनेत जखमी झालेल्या ज्योती शिवाजी अहिरे (वय ५१) या रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. घटना घडण्यापूर्वी त्या घटनास्थळी ड्रम घेऊन उभ्या होत्या.

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता त्यांनी सुरक्षा सीमारेषा ओलांडून ट्रॉलीमार्गात डोकावून पाहिले असता ही दुर्दैवी घटना घडली.

तातडीने उपचार सुरू

घटनेनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत संबंधित महिलेला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

गैरसमज पसरवू नका : प्रशासनाचे आवाहन

मविप्र पदाधिकारी, कार्यकारिणी मंडळ आणि रुग्णालय प्रशासनाकडून पीडितांना सर्वोतोपरी सहकार्य केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीती अथवा गैरसमज निर्माण होईल, अशी अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये आणि रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधिष्ठात्यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0