चाकणमध्ये अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश; 251 सिलिंडरांसह 9.71 लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर छापा टाकून 251 गॅस सिलिंडर, गॅस रिफिलिंग साहित्य आणि वाहनासह 9.71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर मोठी कारवाई करत 251 गॅस सिलिंडर, गॅस रिफिलिंग साहित्य आणि वाहनासह एकूण 9 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पोलिसांना माहिती मिळाली होती की, चाकण मार्केट यार्ड परिसरातील एका ठिकाणी मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात आहे. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा टाकला असता अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान 251 गॅस सिलिंडर, वजन काटा, नोजल व इतर गॅस रिफिलिंग साहित्य तसेच एक महिंद्रा बोलेरो वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 9 लाख 71 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात संबंधित गॅस एजन्सी मालकाच्या सांगण्यावरून काम करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत हे आरोपी कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता गॅसचे रिफिलिंग करत असल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

