जगताप डेअरी परिसरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जगताप डेअरी ते वाकड परिसरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करत ६,९४५ चौ. मी. क्षेत्रातील अतिक्रमण हटविले. ३३ पत्राशेडवर निष्कासनाची मोहीम राबवण्यात आली.

Apr 30, 2026 - 05:15
 0  2
जगताप डेअरी परिसरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई
पिंपरी चिंचवड महापालिका, अतिक्रमण कारवाई

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २९ एप्रिल २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जगताप डेअरी ते वाकड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली. आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल ६ हजार ९४५ चौ. मीटर अतिक्रमण हटविण्यात आले, तसेच ३३ पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

महापालिकेकडून वाकड परिसरातील १०४ मालमत्तांची यादी तयार करण्यात आली होती. न्यायालयीन स्थगिती किंवा अटींसह स्थगिती असलेल्या मालमत्ता वगळून उर्वरित सर्व अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.

ही मोहीम आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई पार पडली.

कारवाईसाठी महापालिकेचे १५० अधिकारी व कर्मचारी, १०४ पोलीस कर्मचारी, तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ६० जवान तैनात करण्यात आले होते. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जेसीबी मशीन वापरण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलाची एक गाडी आणि दोन ॲम्बुलन्स घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवून नागरिकांना सुरक्षित आणि नियोजनबद्ध शहरी सुविधा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत आणि सुयोग्य विकास साधण्यासाठी अनधिकृत बांधकामांना आळा घालणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा कठोर कारवाई अटळ आहे.”

महत्त्वाचे म्हणजे, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सुरू असलेली ही कारवाई उद्या देखील सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0