ऊसतोड कामगारांच्या आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
कोल्हापुरात गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी ऊसतोड कामगारांच्या आर्थिक मदतीसाठी त्रुटीविरहित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. जखमी कामगारांच्या बाबतीत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून अधिकाधिक सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्या आर्थिक मदतीसंदर्भातील प्रस्ताव परिपूर्ण आणि त्रुटीविरहित स्वरूपात जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात यावेत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अनुदान योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
गजानन गुरव म्हणाले की, ऊसतोड कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांना मदत करताना मानवीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. जखमी ऊसतोड कामगारांच्या प्रकरणांमध्ये संबंधित साखर कारखान्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावेत. तसेच काही आर्थिक मदतीच्या प्रस्तावांवर सिव्हिल सर्जन यांचा अभिप्राय घेण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्ताव सादर करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची माहिती सादर केली.
या बैठकीला डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, महेंद्र कांबळे, बी. बी. पाटील तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
