राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकांची तिकिटे आता ‘तिकीटालय’ ॲपवर; ८ जूनपासून रंगणार नाट्यमहोत्सव

३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकांची तिकिटे प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार आहेत. ८ ते १८ जूनदरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात अंतिम फेरीचे प्रयोग रंगणार आहेत.

Jun 4, 2026 - 20:04
 0  3
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकांची तिकिटे आता ‘तिकीटालय’ ॲपवर; ८ जूनपासून रंगणार नाट्यमहोत्सव
३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकांची तिकिटे यंदा प्रथमच ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार आहेत.

मुंबई, दि. ४ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीस ८ ते १८ जून २०२६ या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीतील नाटकांची तिकिटे ऑनलाईन पद्धतीने ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण या अंतिम फेरीत होणार असून रसिकांना उत्कृष्ट नाट्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. विविध नामांकित नाट्यसंस्था आणि निर्मात्यांचे नाट्यप्रयोग या स्पर्धेत सादर केले जाणार आहेत.

८ जून रोजी ‘ठरलंय FOREVER’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ‘सविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके – उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमी’ आणि ‘शंकर जयकिशन’ हे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत.

या नाट्यकृतींमधून सामाजिक, कौटुंबिक, विनोदी तसेच समकालीन विषयांचे विविध पैलू रंगभूमीवर उलगडले जाणार आहेत. त्यामुळे नाट्यरसिकांसाठी ही अंतिम फेरी एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा उद्देश राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट नाट्यनिर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा अधिक उंचावणे हा आहे.

स्पर्धेतील सर्व नाट्यप्रयोगांसाठी तिकीट दर ५० रुपये आणि ३० रुपये निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस अगोदर सकाळी १० वाजल्यापासून ‘तिकीटालय’ ॲपवर तिकीट विक्री सुरू होणार आहे.

या नव्या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन अधिकाधिक नाट्यप्रेमींनी स्पर्धेतील उत्कृष्ट नाट्यप्रयोगांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0