म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन; नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय
म्हाडातर्फे १३ जुलै २०२६ रोजी वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात १९ वा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चा करून तात्काळ निर्णय घेतले जाणार आहेत.
मुंबई | ब्यूरो : अनिल सावरे
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) तर्फे १९ वा लोकशाही दिन सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनाचे अध्यक्षस्थान म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) भूषविणार आहेत.
म्हाडा प्रशासनाने नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी २०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा मुख्यालयात लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करण्यात येत असून, आजपर्यंत १८ लोकशाही दिनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
लोकशाही दिनामध्ये नागरिकांच्या तक्रारी आणि अर्जांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघाली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळण्यास मदत झाली आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख झाल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
प्रत्येक लोकशाही दिनापूर्वी उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे मागील लोकशाही दिनातील प्रकरणांवरील कार्यवाहीचा आढावा घेतात. त्यामुळे तक्रारींच्या निवारण प्रक्रियेला अधिक गती मिळत असून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत आहे.
लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी अर्जदाराने विहित नमुन्यातील तक्रार अर्ज दोन प्रतींमध्ये किमान १५ दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 'नागरिकांसाठी – लोकशाही दिन' या विभागात उपलब्ध आहे.
म्हाडाने स्पष्ट केले आहे की, न्यायप्रविष्ट प्रकरणे, महसूल किंवा अपील विषयक बाबी, सेवाविषयक प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेले अर्ज, आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज तसेच यापूर्वी अंतिम उत्तर देण्यात आलेल्या विषयांवरील पुनरावृत्तीचे अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. अशा अर्जांची संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसांच्या आत पाठविण्यात येईल आणि त्याची माहिती अर्जदारालाही देण्यात येईल.
म्हाडा प्रशासनाने नागरिकांना आपल्या वैयक्तिक तक्रारींचे त्वरित निवारण करून घेण्यासाठी या लोकशाही दिनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0