गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांसाठी फूड स्टॉलची मनसेची मागणी; रोजगारासाठी पालिकेकडे निवेदन

गिरगाव चौपाटीवर पिढ्यानपिढ्या मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना मांसाहारी फूड स्टॉल उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. यासंदर्भात डी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

Jun 25, 2026 - 19:37
 0  10
गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांसाठी फूड स्टॉलची मनसेची मागणी; रोजगारासाठी पालिकेकडे निवेदन
गिरगाव चौपाटी, कोळी समाज, मनसे, फूड स्टॉल मागणी,

मुंबई | प्रतिनिधी : मिलिंद कारेकर

गिरगाव चौपाटीवर पिढ्यानपिढ्या मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून त्यांच्या रोजगारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. गिरगाव चौपाटीवरील कोळी समाजाला मांसाहारी खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी मनसेच्या मलबार हिल विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांचा पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय विविध कारणांमुळे अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरगाव चौपाटी परिसरात महानगरपालिकेकडून होत असलेल्या कारवाईमुळे मच्छीमारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळी बांधवांच्या बोटी जप्त केल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

या प्रश्नासंदर्भात कोळी बांधवांनी स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडेही मदतीची मागणी केली होती. मात्र अपेक्षित तोडगा न निघाल्याने मच्छीमार समाजात अस्वस्थता वाढली आहे. पिढ्यानपिढ्या सुरू असलेला व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधत गिरगाव चौपाटीवर इतरांना ज्या पद्धतीने फूड स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्याच धर्तीवर कोळी समाजालाही मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मलबार हिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी डी विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन सादर केले.

मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी सांगितले की, गिरगाव चौपाटीवर शाकाहारी खाद्यपदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि खाद्यप्रेमी येत असतात. त्याचप्रमाणे कोळी समाजाच्या पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या चविष्ट मांसाहारी पदार्थांनाही मोठी मागणी मिळू शकते. त्यामुळे कोळी बांधवांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल आणि त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळेल.

कोळी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0