निकृष्ट सेवा रस्ता तत्काळ तोडा; खासदार श्रीरंग बारणे यांचे एनएचआय अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील किवळे ते वाकड सेवा रस्त्याच्या निकृष्ट कामावर खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त करत १५ दिवसांत सद्यस्थितीतील काम काढून नव्याने दर्जेदार काम करण्याचे निर्देश एनएचआय अधिकाऱ्यांना दिले.

May 11, 2026 - 04:05
 0  3
निकृष्ट सेवा रस्ता तत्काळ तोडा; खासदार श्रीरंग बारणे यांचे एनएचआय अधिकाऱ्यांना निर्देश
श्रीरंग बारणे, सेवा रस्ता, मुंबई बंगळुरू महामार्ग, किवळे वाकड रस्ता,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) मामुर्डी ते वाकड दरम्यान सुरू असलेल्या सेवा रस्त्याच्या निकृष्ट कामावर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. किवळे परिसरातील सद्यस्थितीतील निकृष्ट काम पूर्णपणे काढून टाकून येत्या १५ दिवसांत नव्याने दर्जेदार काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरील मामुर्डी ते वाकड येथील मुळा नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी १२ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचा विस्तार करण्यात येत आहे. या कामाची खासदार बारणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा प्रमुख राजेंद्र तरस तसेच महामार्ग विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

“निकृष्ट काम सहन केले जाणार नाही”

खासदार बारणे म्हणाले की, किवळे येथे सेवा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी दर्जाहीन काम आढळून आल्याने संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या.

“नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि दैनंदिन वाहतुकीशी संबंधित कामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. येत्या १५ दिवसांत सद्यस्थितीतील निकृष्ट काम पूर्णपणे काढून नव्याने दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करावे,” असे निर्देश त्यांनी दिले.

वाहतूक कोंडी कमी करण्याच्या सूचना

या सेवा रस्त्याची पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काम गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ असणे आवश्यक असल्याचे खासदार बारणे यांनी नमूद केले.

कामामुळे समीर लॉन्स परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पावसाळा तोंडावर आला असूनही काम पूर्ण झाले नसल्याने कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.