वैद्यकीय पदवी-परवाना नसताना उपचार; पाच बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मुंबईतील झाकीर हुसेन नगर, देवनार आणि नौपाडा-बांद्रा पूर्व परिसरात वैद्यकीय पदवी व अधिकृत परवाना नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली. आरोपींकडून १ लाख १९ हजार ३२४ रुपयांचे इंजेक्शन, औषधे, सिरिंज व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. १४ ऑगस्ट २०२६ : वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी किंवा अधिकृत वैद्यकीय परवाना नसताना नागरिकांवर उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. झाकीर हुसेन नगर, देवनार तसेच नौपाडा-बांद्रा पूर्व परिसरातील पाच क्लिनिकवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रुग्णांवर उपचार करणारे पाच जण पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्या ताब्यातून १ लाख १९ हजार ३२४ रुपये किमतीचे इंजेक्शन, औषधे, सिरिंज आणि अन्य वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बृहन्मुंबईतील झाकीर हुसेन नगर, देवनार आणि नौपाडा-बांद्रा पूर्व परिसरात कोणतीही वैद्यकीय पदवी संपादित न करता किंवा कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसतानाही नागरिकांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या व्यक्तींबाबत मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ आणि कक्ष ८ यांना विश्वसनीय माहिती मिळाली होती. हे कथित बोगस डॉक्टर रुग्णांकडून भरमसाठ शुल्क घेऊन त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पाच क्लिनिकवर पोलिसांचे छापे
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष ६ व कक्ष ८च्या पथकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने झाकीर हुसेन नगर आणि देवनार परिसरातील चार क्लिनिक तसेच नौपाडा-बांद्रा पूर्व परिसरातील एका क्लिनिकवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पाचही आरोपी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासली असता त्यांच्याकडे अधिकृत वैद्यकीय परवाना नसल्याचे तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये डॉक्टर म्हणून नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाई करण्यात आलेले पाच जण
पोलिसांच्या कारवाईत खालील पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे :
सगीर अहमद अब्दुल माजिद हाशमी, वय ३९ वर्षे – ‘डॉ. सगीर क्लिनिक’
अखिलेश कुमार देवेंद्र कुमार दुबे, वय ४७ वर्षे – ‘गायत्री क्लिनिक’
मेहमूद आलम मोहम्मद शरीफ शेख, वय ३६ वर्षे – ‘आयेशा क्लिनिक’
केशव प्रसाद कुद्दुर पटेल, वय ५६ वर्षे – ‘पटेल क्लिनिक’
मोहम्मद आफताब शौकिम खान, वय ५६ वर्षे – ‘आफताब खान क्लिनिक’
हे सर्व जण कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टर असल्याचे भासवून विविध आजारांवर रुग्णांवर उपचार करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
१ लाख १९ हजार रुपयांचे औषध व वैद्यकीय साहित्य जप्त
या बोगस डॉक्टरांकडून पोलिसांनी विविध प्रकारचे इंजेक्शनच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक टॅब्लेट्स तसेच इतर औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत १,१९,३२४ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत परवाना नसताना रुग्णांवर उपचार करणे हा गंभीर प्रकार असून अशा व्यक्तींमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.
देवनार आणि निर्मल नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
या प्रकरणी संबंधित पाच बोगस डॉक्टरांविरुद्ध देवनार पोलीस ठाणे आणि निर्मल नगर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पुढील तपास संबंधित पोलिसांकडून करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पूर्व) धर्मपाल बनसोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पश्चिम) सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे आणि कक्ष ८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश माळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. कारवाईमध्ये कक्ष ६ व कक्ष ८ मधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते.
बोगस डॉक्टरांकडून नागरिकांची होणारी फसवणूक आणि त्यांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, अशा अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाविरोधात पुढील काळातही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0