मुंबईतील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

मुंबईतील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व वॉर्ड सहायक आयुक्तांनी दररोज स्वच्छता चौक्यांना भेट देऊन पाहणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.

Jul 22, 2026 - 20:17
 0  6
मुंबईतील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
मुंबई स्वच्छता, बीएमसी, डॉ. विपिन शर्मा, बृहन्मुंबई महानगरपालिका,

मुंबई | प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई महानगरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांच्या (वॉर्ड) सहायक आयुक्तांनी दररोज सकाळी स्वच्छता चौक्यांना प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छता कामांचा आढावा घ्यावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. स्वच्छता कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचाही त्यांनी इशारा दिला.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षात आयोजित 'दृश्यमान स्वच्छता' (Visible Cleanliness) आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला सर्व परिमंडळांचे उपायुक्त, वॉर्ड सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दररोज प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश

डॉ. शर्मा यांनी सांगितले की, रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि बसथांब्यांची नियमित स्वच्छता होत असल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घ्याव्यात. कोणत्याही भागात कचऱ्याचे ढीग साचू नयेत यासाठी प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण देखरेख आणि तातडीची कार्यवाही आवश्यक आहे.

GVP ठिकाणांवर विशेष लक्ष

कचरा साचण्याची शक्यता असलेल्या Garbage Vulnerable Points (GVP) वर विशेष स्वच्छता मोहीम राबवून नियमित निर्जंतुकीकरण, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. कचरा साचण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला.

उच्च न्यायालयाच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी

माननीय उच्च न्यायालयाने मुंबईतील स्वच्छतेबाबत केलेल्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने नियुक्त केलेले पथक कोणत्याही वेळी आकस्मिक पाहणी करू शकते. त्यामुळे सर्व विभागांनी सतत दक्ष राहून शहरात दृश्यमान स्वच्छता कायम ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे स्वच्छता आणि वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे नमूद करत, अनधिकृत फेरीवाल्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जनसहभाग आणि लोकप्रतिनिधींसोबत समन्वय

स्थानिक नागरिक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवावी. तसेच आमदार, नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींसोबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवून त्यांच्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले.

तक्रारींचे तातडीने निराकरण

स्वच्छतेबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळेत निवारण करून संबंधितांना त्याची माहिती देणे ही प्रत्येक प्रशासकीय विभागाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, या कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0