“FIR शिवाय चौकशी म्हणजे केवळ दिखावा” – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ₹६० कोटींच्या कथित घोटाळ्यावर दक्ष नागरिक संघ आक्रमक
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ₹६० कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दक्ष नागरिक संघाने तीव्र भूमिका घेतली असून तात्काळ FIR नोंद करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ अंतर्गत चौकशी ही दिशाभूल करणारी असून निष्पक्ष तपासासाठी पोलिस कारवाई आवश्यक असल्याचे संघाचे अध्यक्ष ॲड. अजित बोराडे यांनी स्पष्ट केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ₹६० कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दक्ष नागरिक संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ गुन्हा (FIR) नोंद करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष ॲड. अजित बोराडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या प्रकरणात स्थायी समिती व महासभेत बनावट ठराव मंजूर करून कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर केल्याचा गंभीर आरोप आहे. प्राथमिक चौकशीत किमान १४ बनावट ठरावांची नोंद समोर आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप FIR दाखल न झाल्याने तपास प्रक्रियेला सुरुवात होत नसल्याचे बोराडे यांनी नमूद केले.
“FIR नोंद झाल्याशिवाय पोलीस यंत्रणा कार्यान्वित होत नाही. पंचनामा, कागदपत्र तपासणी व फॉरेन्सिक चौकशीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया थांबतात. त्यामुळे अंतर्गत चौकशी हा केवळ वेळकाढूपणा आहे,” अशी टीका त्यांनी केली.
महापालिका प्रशासनाने स्वतःच चौकशी करणे निष्पक्ष कसे ठरू शकते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला ७ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0