जपान-भारत सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर; सभापती प्रा. राम शिंदे यांची जपानी वाणिज्यदूत साटो हितोमी यांच्यासोबत चर्चा
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांच्यासोबत झालेल्या सदिच्छा भेटीत भारत-जपान संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. आर्थिक, तांत्रिक, औद्योगिक आणि सामरिक सहकार्य वाढवून ‘विकसित भारत 2047’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जपानची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, प्रतिनिधी दि. २ : भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक सहकार्य अधिक बळकट करण्याची आवश्यकता असून ‘विकसित भारत 2047’चे स्वप्न साकार करण्यासाठी जपानसारख्या प्रगत देशांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
मुंबईतील विधानभवनात जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासाचे उप-वाणिज्यदूत निशिओ र्यो, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी स्वप्नील थोरात, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये आणि सभापती यांचे सचिव पंडित खेडकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे यांनी द्वितीय महायुद्धानंतर जपानने केलेल्या पुनर्निर्माणाचा आणि विकासाचा उल्लेख करत जपानच्या प्रगतीचे कौतुक केले. महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून राज्यात उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी जपानी सहकार्याचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेचा उल्लेख करत प्रा. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाभिमुख धोरणांना गती मिळत आहे. राज्यातील गुंतवणूकक्षम वातावरणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी परिसरात जपानी कंपन्यांनी 500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याची माहिती देत त्यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक विकासात जपानचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) कडून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख करत भारत-जपान मैत्रीचे संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या प्रगतीसाठी जपानचा सकारात्मक सहभाग
जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी भारत आणि जपान यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक आदानप्रदानाला विशेष महत्त्व असल्याचे नमूद केले. भारतात काम करण्याचा दीर्घ अनुभव लाभल्याचे सांगताना मुंबईत कार्य करण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भारत-जपान संबंध गेल्या काही वर्षांत अधिक मजबूत झाले असून आगामी काळातही महाराष्ट्रासह भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपानचा सकारात्मक सहभाग कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटीत द्विपक्षीय सहकार्य वाढविणे, गुंतवणूक, पायाभूत सुविधा विकास आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0