केंद्राच्या योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचवा; 'दिशा' बैठकीत खासदार धैर्यशील माने यांचे निर्देश
कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती (दिशा) बैठकीत केंद्र शासनाच्या ७९ योजनांचा आढावा घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वयाने काम करून योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.
कोल्हापूर प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. १६ : जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती (दिशा) बैठकीत केंद्र शासनाच्या ७९ विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वयाने काम करून शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष, सभापती आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी काही विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी ज्या विभागांच्या कामात त्रुटी आहेत त्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात, असे स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने पुढील बैठकीसाठी कृती अहवाल (Action Taken Report - ATR) सादर करावा तसेच बैठकीस विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कोल्हापूर हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिलेला जिल्हा असून, सर्व विभागांच्या समन्वयातून विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लाभार्थ्यांचा शोध घेऊन योजनांचा लाभ द्या
खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थी स्वतः येण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्यांचा शोध घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने लाभ द्यावा, असे निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आगामी संसदेच्या अधिवेशनात संबंधित केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडून त्यांचा पाठपुरावा केला जाईल, असे सांगत आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
स्थानिकांना रोजगारात प्राधान्य आणि मुद्रा योजनेचा स्वतंत्र आढावा
आढाव्यादरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी शासकीय विभागांतील कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यावर भर दिला. तसेच रेल्वे विभागाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, मुद्रा योजनेतील थकबाकीमुळे लाभापासून वंचित राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी उपाययोजना कराव्यात आणि प्रस्ताव नाकारताना त्याची कारणे स्पष्टपणे नमूद करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक बैठकीत मुद्रा योजनेचा स्वतंत्र आढावा घेण्याचेही निर्देश देण्यात आले.
पूरबाधित गावांसाठी नियोजन आणि खेळाडूंना CSR मधून मदत
खासदार धनंजय महाडिक यांनी नव्याने सुरू झालेल्या व्हीबी-जी-राम-जी योजनेची गावपातळीवर व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला. पूरबाधित गावांसाठी निवारा गृह, संरक्षक भिंती आणि अन्य आवश्यक कामांचे गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
याशिवाय, जिल्ह्यातील खेळाडूंना बँकांच्या CSR निधीतून विमा संरक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत विविध सदस्यांनी आपल्या भागातील प्रश्न मांडले. दिव्यांग सक्षमीकरण शिबिरे तालुकास्तरावर आयोजित करावीत, तसेच केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी जनजागृती गावागावांत करण्यात यावी, अशा सूचनाही सदस्यांनी मांडल्या.
बैठकीत विविध योजनांचा सविस्तर आढावा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0