इंदिरा गांधी महाविद्यालयात चौथी कबड्डी लीग उत्साहात संपन्न; संदेश वॉरियर्स आणि जय जिजाऊ संघ विजेते
विक्रोळी पार्कसाईट येथील इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या ‘झुंजार’ क्रीडा विभागातर्फे आयोजित चौथी कबड्डी लीग मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मुलांच्या गटात संदेश वॉरियर्स तर मुलींच्या गटात जय जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले.
संतोष पांडे : प्रतिनिधी
घाटकोपर: ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या ‘झुंजार’ क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी कबड्डी लीग स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात आणि क्रीडाभावनेच्या वातावरणात संपन्न झाली.
या कबड्डी लीग स्पर्धेत शैक्षणिक संकुलातील संस्थेच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत मुलांचे पाच संघ आणि विद्यार्थिनींचे चार संघ सहभागी झाले होते. खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया, दमदार पकडी आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
कबड्डी लीग स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त तथा प्राचार्य मेघा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक सतीश कदम, मुख्याध्यापक प्रवीण झोपे, माजी उपप्राचार्य अजित आडकर, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू प्रतीक गाढवे, क्रीडा शिक्षिका प्रिया पेंडुलकर, नितीन पाटील, पर्यवेक्षक जनार्दन वैद्य आदी मान्यवरांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले.
स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यांनंतर मुलांच्या गटात संदेश वॉरियर्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर मुंबई वॉरियर्स संघाने उपविजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात जय जिजाऊ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर सावित्रीबाई संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुलांच्या गटातून रोहित सुनार आणि मुलींच्या गटातून सानिका निपाणे यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक पटकावले. सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणून सनील शिंदे आणि प्रांजल जाधव यांना गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट पकडपटू म्हणून प्रज्ञेश पिंदणकर आणि परी कोरी यांनी पारितोषिक मिळविले.
या सर्व विजेत्या आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता म्हात्रे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती करावी, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे कबड्डी प्रशिक्षक सचिन पाष्टे, शिवाजी कालेकर, सुनील तांबे, रोहन शेडगे, समाजमाध्यम प्रसिद्धी प्रमुख सुयश म्हात्रे, हार्दिक म्हात्रे तसेच महाविद्यालयाच्या ‘झुंजार’ क्रीडा विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कबड्डी लीगमुळे आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली असून, सांघिक भावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि क्रीडाभावना विकसित करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0