कजरी महोत्सवात मराठी गीतांची सुरेल मैफल; उत्तर भारतीय-मराठी सांस्कृतिक ऐक्याचा अनोखा संगम
मुंबईतील कजरी महोत्सवात उत्तर प्रदेशच्या लोकगायिका संजोली पांडेय यांनी पारंपरिक कजरींसह मराठी गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. भाजप नेते अमरजीत मिश्रा यांच्या पुढाकाराने आयोजित महोत्सवातून सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.
संतोष पांडे
घाटकोपर प्रतिनिधी
मुंबई, दि. ६ : उत्तर भारतीय समाजातील श्रावण महिन्यातील कजरी गायनाची समृद्ध लोकपरंपरा जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कजरी महोत्सवात यंदा मराठी गीतांचाही सुरेल संगम अनुभवायला मिळाला. उत्तर प्रदेशच्या लोकगायिका संजोली पांडेय यांनी पारंपरिक कजरींसह मराठी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
भाजप मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या पुढाकाराने अभियान संस्था गेल्या दोन दशकांपासून कजरी महोत्सवाचे आयोजन करत आहे. या महोत्सवाला दरवर्षी उत्तर भारतीय महिला, लोकसंगीतप्रेमी आणि सांस्कृतिक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
यंदाच्या महोत्सवात ५ ऑगस्ट रोजी मुंबई आणि ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात संजोली पांडेय यांनी आपल्या मधुर आवाजात पारंपरिक कजरींसह मराठी गाण्यांचे सादरीकरण केले. त्यांच्या सुरेल गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. "एक भारत, श्रेष्ठ भारत" या संकल्पनेचा सुंदर प्रत्यय या सादरीकरणातून आल्याची भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली.
यावर्षी १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत मुंबईतील विविध भागांमध्ये कजरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सांस्कृतिक सोहळा साजरा होत असून भारतीय लोकसंगीत आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
याबाबत आयोजक अमरजीत मिश्रा यांनी सांगितले की, बदलत्या काळात लोकपरंपरा आणि लोकसंगीत जपणे ही काळाची गरज आहे. कजरी महोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्याबरोबरच उत्तर भारतीय आणि मराठी समाजामधील सांस्कृतिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कजरी महोत्सवाच्या माध्यमातून लोककला, भाषा आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाफ घडत असून, विविधतेत एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम मुंबईतील सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0