जनशिक्षण संस्थानमध्ये २५ लाभार्थ्यांना ‘बार्बर सलून’ प्रशिक्षण; पीएम विश्वकर्मा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक बार्बर सलून प्रशिक्षण, पीएम विश्वकर्मा योजना, जनशिक्षण संस्थान नाशिक, कौशल्य विकास नाशिक, सलून व्यवसाय प्रशिक्षण, नाशिक रोजगार योजना, बार्बर कोर्स नाशिक, भारत सरकार योजना, युवक उद्योजकता, मराठी बातमी
नाशिक ब्यूरो
नाशिक : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनशिक्षण संस्थान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत ‘असिस्टंट बार्बर सलून’च्या दोन बॅचेसचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणात २५ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
उत्तमनगर, सिडको येथील जनशिक्षण संस्थानमध्ये आयोजित या प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाणा, नांदगाव, मालेगाव, दिंडोरी, इगतपुरी, निफाड आणि कळवण तालुक्यातील युवकांनी सहभाग घेतला.
पाच दिवसीय प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांना हेअर स्टाइलचे विविध प्रकार, हेअर कटिंग, दाढी व शेव्हिंग, केसांची निगा, हेअर कंडीशनर, हेअर स्पा, हेअर कलर, त्वचेची निगा, मेकअप, फेशियल तसेच सलून मशिनरीचा वापर आणि देखभाल याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणात बँक ऑफ महाराष्ट्रचे लीड बँक मॅनेजर लवाटे यांनी व्यवसायासाठी उपलब्ध विविध बँक कर्ज योजनांची माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्र नाशिकचे इन्स्पेक्टर लभडे यांनी सीएमईजीपी योजनेंतर्गत मिळणाऱ्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
जनशिक्षण संस्थेचे संचालक राहुल ठाकरे यांनी सलून व्यवसाय आधुनिक पद्धतीने कसा विकसित करावा, स्वच्छता कशी राखावी, ग्राहकांशी संवाद कसा साधावा आणि व्यवसाय वाढीसाठी नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
नाशिक जिल्ह्याचे पीएम विश्वकर्मा समन्वयक प्रदीप राठोड यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना व्यवसायासाठी १५ हजार रुपयांचे टूलकिट, तसेच एक लाख रुपयांपर्यंत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत माहिती दिली.
सलून प्रशिक्षणासाठी जनशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक शिक्षिका स्मिता उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले, तर मनमाड येथील रिता घोडके यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी केंद्र समन्वयक संदीप शिंदे, प्रताप देशमुख, संगीता देठे, दत्तात्रेय भोकनळ, सुखदेव मतसागर आणि मनोज खांदवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की, आगामी काळात पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत विविध कौशल्याधारित व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवून युवकांना आत्मनिर्भर आणि सक्षम करण्यात येणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0