महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये ‘जाणता राजा’ महानाट्याचे भव्य आयोजन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त १ मे रोजी निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानात ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

Apr 30, 2026 - 05:19
 0  1
महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये ‘जाणता राजा’ महानाट्याचे भव्य आयोजन
पिंपरी चिंचवड, जाणता राजा, महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २९ एप्रिल २०२६ – महाराष्ट्र राज्य स्थापना दिन तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी भव्य सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

निगडी, सेक्टर २५ येथील मदनलाल धिंग्रा मैदानात हे महानाट्य दि. १ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.

हे महानाट्य महाराष्ट्र कीर्ती सोहळा प्रतिष्ठान आयोजित असून, पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित आहे. आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे ऐतिहासिक महानाट्य म्हणून ‘जाणता राजा’ची ओळख आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे असणार आहेत. तसेच विविध लोकप्रतिनिधी, नगरसदस्य आणि महापालिका अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, “महाराष्ट्र दिनी या महानाट्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या शौर्य आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन युवकांनी कार्य करावे, यासाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.”

‘जाणता राजा’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यात स्वराज्य स्थापनेचा इतिहास, शौर्यगाथा आणि मराठी अस्मितेचा अभिमान प्रभावीपणे सादर केला जातो. भव्य नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, जिवंत घोडे-हत्ती आणि शेकडो कलाकारांचा सहभाग यामुळे हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक उपक्रमातून शहरातील नागरिकांना इतिहासाशी जोडण्याचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान जागवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0