महसूल कर्मचाऱ्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे; हेल्थ व टर्म इन्शुरन्स घेण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामासोबत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महसूल दिन कार्यक्रमात केले.
कोल्हापूर प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. १ (जिमाका) : महसूल विभागात काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्याचे विपरीत परिणाम कालांतराने दिसून येतात. त्यामुळे कामाच्या धावपळीतही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच आकस्मिक परिस्थितीत कुटुंबावर आर्थिक बोजा पडू नये यासाठी सर्वांनी हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्ससारख्या विमा पॉलिसी घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.
१ ऑगस्ट रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या महसूल दिनाचे औचित्य साधून महाराणी ताराबाई सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, महसूल विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांशी थेट संबंधित असलेला महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहकार्य करावे. नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलपणे ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
महसूल विभागाची कार्यपद्धती, विभागाचे महत्त्व तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महसूल विभागाची भूमिका याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत आणि प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
२६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट पुरस्काराने सन्मान
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण २६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी महसूल दिनाचे औचित्य साधून अपर जिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, अंकुश रानमाळे आणि भाऊसाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकाभिमुख सेवा देतानाच स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेकडेही लक्ष द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0