विक्रोळीत दुहेरी हत्याकांड; मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून भाऊ आणि पुतण्याची निर्घृण हत्या
विक्रोळी पश्चिमेतील राहुल नगर येथे मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांनी मोठ्या भावाची आणि १४ वर्षीय पुतण्याची चाकूने हत्या केली. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
संतोष पांडे
घाटकोपर प्रतिनिधी
मुंबई, दि. ६ : विक्रोळी पश्चिम येथील पार्कसाईट परिसरातील राहुल नगरमध्ये मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे भीषण रूप धारण करत दोन सख्ख्या भावांनी आपल्या मोठ्या भावाची आणि १४ वर्षीय पुतण्याची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडली. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (वय ४०) आणि त्यांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा (वय १४) यांचा मृत्यू झाला असून, सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नगर येथे विश्वकर्मा कुटुंबात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर आरोपी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत धारदार चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा श्लोक गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे राहुल नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घरगुती वादातून घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस उपायुक्तांची प्रतिक्रिया
"ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून झालेल्या घरगुती वादातून हा प्रकार घडला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे."
— अभयसिंह देशमुख, पोलीस उपायुक्त, पूर्व परिमंडळ-३
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1