विलेपार्ले येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम उत्साहात
विलेपार्ले येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा व जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन; १५५ ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे:
विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा व जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व) येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास विलेपार्ले पोलीस ठाण्यातील ११०, सहार पोलीस ठाण्यातील २०, वाकोला पोलीस ठाण्यातील १५ आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील १० असे एकूण १५५ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या कै. आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर अश्रफ खान यांनी ‘साझ और आवाज’ ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सुरेल गाण्यांची मैफल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांनी सायबर जागरूकता आणि महिला सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर माहिती दिली.
सायबर तज्ञ कैलास कांदळकर यांनी गॅस कनेक्शन, वीज डिस्कनेक्शनसंदर्भात येणारे फसवे कॉल आणि त्यापासून बचावाचे उपाय स्पष्ट केले. तसेच सायबर अधिकारी भरत गुरव यांनी शासनाच्या विविध योजना, हेल्पलाइन क्रमांक १९३०, १९४५ आणि ‘सारथी’ अॅपविषयी माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा केक कापून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक (जनसंपर्क) चैत्राली साबळे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0