जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार – ललित गांधी

जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापुरात जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासह समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

Jul 29, 2026 - 21:48
 0  6
जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार – ललित गांधी
ललित गांधी, जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळ, जैन विद्यार्थी, जैन वसतिगृह,

कोल्हापूर प्रतिनिधी | उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : देश आणि राज्यात अत्यंत अल्पसंख्यांक असलेल्या जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जैन समुदायाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध शासकीय विभागांकडून जैन अल्पसंख्यांक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, सामाजिक प्रश्न आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

ललित गांधी म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जैन मुला-मुलींसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 16 वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. कोल्हापुरातही येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दोन एकर जागेची मागणी करण्यात आली आहे.

या वसतिगृहांमुळे जैन समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात येण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यात जैन समुदायाची आठ ‘क’ वर्गातील आणि तीन ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रे असून, या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासन अनुकूल असल्याचे गांधी यांनी सांगितले. समाजाच्या विकासासाठी शासनाकडून उपलब्ध होणारा निधी हा प्रामुख्याने समाजाच्या पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या कामांसाठी खर्च करण्याला प्राधान्य दिले जाईल. जैन अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जैन समुदायाच्या विकासाशी संबंधित विविध कामांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील, असे सांगितले. ज्या गावांमध्ये जैन समुदायाची लोकसंख्या अधिक आहे, त्या ठिकाणी पोलीस विभागाने शांतता समितीमध्ये जैन समुदायातील प्रतिनिधींना स्थान द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

स्थानिक जैन तीर्थक्षेत्रांमध्ये तीर्थक्षेत्र विकास निधीतून लोकपयोगी आणि आवश्यक विकासकामे करण्यास जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन यांनी महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जैन समुदायासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती बैठकीत दिली.

या बैठकीत ललित गांधी यांनी जिल्हा नियोजन विभाग, जिल्हा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण बँक, एमआयडीसी आदी विभागांकडून जैन अल्पसंख्यांक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि सामाजिक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीदरम्यान जैन धर्मीयांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि प्रश्न उपस्थित जैन समाज प्रतिनिधींनी मांडले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, महानगरपालिका शहर अभियंता रमेश मस्कर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी योगेश कुंभार यांच्यासह जिल्ह्यातील जैन समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.