मान्सूनपूर्व तयारीला वेग; आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यातील यंत्रणा सज्ज : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन, बचाव यंत्रणा, आरोग्य सुविधा, रेल्वे सुरक्षा आणि पूरस्थिती नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

May 22, 2026 - 23:02
 0  5
मान्सूनपूर्व तयारीला वेग; आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यातील यंत्रणा सज्ज : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. २२ : आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यासाठी व्यापक तयारी केली असून विविध शासकीय यंत्रणांची पूर्वतयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरणाद्वारे मांडण्यात आली.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत आयोजित बैठकीत राज्य शासनाच्या पूर्वतयारी आणि आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी यावेळी सादरीकरण केले.

राज्यातील संभाव्य पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्यासोबत समन्वय वाढविण्यात आला आहे.

वेस्टर्न नौदल कमांडकडून मोठी आणि लहान जहाजे, हेलिकॉप्टर तसेच इंटरसेप्टर क्राफ्ट सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर भारतीय वायुदलाकडून एअर ॲम्ब्युलन्स आणि एअर कार्गो सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) १० टीम कार्यरत असून आणखी दोन टीमना मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईत विशेष उपाययोजना

मुंबईतील अतिवृष्टी आणि पाणी साचणाऱ्या भागांसाठी ४३ मोठी पंपिंग स्टेशन्स कार्यरत ठेवण्यात आली आहेत. तसेच स्मार्ट पंप मॉनिटरिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

कोकण आणि घाट विभागातील रेल्वेमार्गांवर पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणाही सज्ज

राज्यातील रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी ३ हजार खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहेत.

जिल्हास्तरावरील तयारीचा आढावा

कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील विभागीय आयुक्तांनी जिल्हास्तरावरील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा यावेळी सादर केला.

कोकण विभागातील ९३९ गावे दरडप्रवण क्षेत्रात येत असल्याने विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सावित्री आणि वशिष्ठी नद्यांमध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीपात्रातील गाळ काढण्याची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाय वाढविण्यात आले आहेत.

पावसाळी पर्यटनस्थळांवरील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. तसेच नंदुरबार आणि मेळघाटातील आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अखंडित राहाव्यात यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन पूर्ण केले आहे.

राज्य शासनाने मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0