आपत्कालीन परिस्थितीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर जिल्ह्यात संभाव्य पुरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. राजाराम बंधारा येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात त्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकांची पाहणी केली.

May 17, 2026 - 19:48
 0  7
आपत्कालीन परिस्थितीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर जिल्हा प्रशासन, डॉ विजय राठोड, आपत्ती व्यवस्थापन,

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका):

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली. राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तसेच विविध प्रात्यक्षिकांची त्यांनी आज पाहणी केली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल, दुरुस्ती, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपदा मित्र आणि आपदा सखी यांना आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या आपदा मित्र व सखी यांच्याशी संवाद साधून आपत्कालीन परिस्थितीत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच बचावकार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यामध्ये रेस्क्यू बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, सॉकर कटर, हायड्रोलिक कटर, रेस्क्यू रोप तसेच इमर्जन्सी फ्लोटिंग लाईट्स आदी साहित्याचा समावेश होता. आपत्कालीन परिस्थितीत या उपकरणांचा प्रभावी वापर करून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह आपदा मित्र व आपदा सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0