करवीर हायकर्सच्या सात सदस्यांची ‘एव्हरेस्ट बेस कँप’ मोहीम यशस्वी; तिरंगा फडकवत संविधान उद्देशिकेचे प्रदर्शन
कोल्हापूरच्या करवीर हायकर्सच्या सात सदस्यांनी ५,३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कँप मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. तिरंगा फडकवत आणि संविधान उद्देशिका प्रदर्शित करत मोहिमेची सांगता करण्यात आली.
रत्नागिरी, दि. २५ : कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ संस्थेच्या सात सदस्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामान आणि खडतर परिस्थितीवर मात करत समुद्रसपाटीपासून तब्बल ५,३६४ मीटर उंचीवरील ‘एव्हरेस्ट बेस कँप’ (EBC) मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. राष्ट्रीय ध्वज फडकवत आणि भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करत या मोहिमेची सांगता करण्यात आली.
या मोहिमेत रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सहप्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते, धाराशिव जिल्ह्यातील उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाजमाध्यम प्रभावक नुपूर मठकर आणि अक्षय मठकर यांचा सहभाग होता.
ही मोहीम जगातील सर्वात कठीण पर्वत मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘अन्नपूर्णा’ पर्वत सर करणाऱ्या आणि वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
पथकाने १५ मे रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे दाखल होत मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर जगातील अत्यंत आव्हानात्मक विमानतळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या लुकला विमानतळावरून छोट्या विमानाने प्रवास करून ट्रेकची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
लुकला – फाकडींग – नामचे बाजार – तेंगबोचे – दिंगबोचे – लोबुचे – गोरकशेप – एव्हरेस्ट बेस कँप असा खडतर प्रवास करत पथकाने एव्हरेस्ट बेस कँप गाठला.
शनिवार, दि. २३ मे रोजी एव्हरेस्ट बेस कँपवर भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे प्रदर्शन करून राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान मूल्यांचा संदेश देण्यात आला.
या मोहिमेदरम्यान रात्रीचे तापमान उणे १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जात होते, तर दिवसा तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअस दरम्यान होते. विशेषतः लोबुचे ते एव्हरेस्ट बेस कँप हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक आणि शारीरिक तसेच मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा ठरला.
हाडे गोठवणारी थंडी, विरळ हवा, दुर्गम मार्ग आणि प्रतिकूल हवामान अशा अनेक आव्हानांवर मात करत शरीर आणि मन योग्य तयारीने सक्षमपणे कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकते, असा अनुभव पथकाने व्यक्त केला.
या मोहिमेसाठी नेपाळमधील ‘पीक १५ अॅडव्हेंचर’ संस्थेचे शेखर तमांग, योगेंद्र तमांग आणि प्रशांत तमांग यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
एव्हरेस्ट बेस कँप मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून करवीर हायकर्सच्या या पथकाने साहस, जिद्द, शारीरिक क्षमता आणि राष्ट्रीय अभिमानाचा प्रेरणादायी संदेश दिला आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
