भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्लीतील सीआयआय वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक, तांत्रिक आणि शाश्वत विकासाचा रोडमॅप मांडला. २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत जागतिक प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य त्यांनी स्पष्ट केले.

May 11, 2026 - 21:07
 0  10
भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र अर्थव्यवस्था, सीआयआय परिषद

नवी दिल्ली, दि. ११ : भविष्यातील आर्थिक नेतृत्व हे पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास यांवर आधारित असेल. या सर्व घटकांचा समन्वय साधणाऱ्या अर्थव्यवस्था भविष्यात जगाचे नेतृत्व करतील आणि महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सीआयआय तर्फे नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित ‘ॲन्युअल बिझनेस समिट २०२६’ अंतर्गत झालेल्या ‘व्हिजन फॉर इंडिया@१००’ परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सीआयआयचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी उपस्थित होते.

“भारत बदलाची व्याख्या ठरवत आहे”

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज जग भू-राजकीय विखंडन, ऊर्जा संक्रमण, तांत्रिक बदल आणि पुरवठा साखळीतील अनिश्चिततेतून जात आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भारत स्थैर्य, महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी क्षमतेमुळे जगाचा विश्वास जिंकत आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या दशकात जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे,” असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र ‘डेटा सेंटर’ आणि ‘स्टार्टअप’ राजधानी

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र दशकानुदशके भारताचे ‘इकोनॉमिक इंजिन’ राहिले आहे. आता राज्य जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी स्वतःला सज्ज करत आहे.

सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलरची असून भारताच्या जीडीपीमध्ये राज्याचे सुमारे १५ टक्के योगदान आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

“देशातील अभियांत्रिकी निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. तसेच महाराष्ट्र हा देशाची ‘डेटा सेंटर’ आणि ‘स्टार्टअप’ राजधानी बनला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

२०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत जगातील महत्त्वाच्या प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

दावोस परिषदेत राज्याने जवळपास ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव आकर्षित केल्याची माहिती त्यांनी दिली. “आजचे गुंतवणूकदार केवळ सवलती शोधत नाहीत, तर स्थैर्य, जलद निर्णयप्रक्रिया आणि विश्वासार्ह अंमलबजावणी असलेल्या सरकारांचा शोध घेत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र आशियातील महत्त्वाचा डेटा कॉरिडॉर

भविष्यातील अर्थव्यवस्था महामार्ग, बंदरे, विमानतळ, डिजिटल नेटवर्क्स आणि संशोधन केंद्रांवर उभी राहणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात अभूतपूर्व वेगाने पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवण बंदर यांसारखे प्रकल्प राज्याचा आर्थिक भूगोल बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“देशातील ६० टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. राज्य आशियातील सर्वात महत्त्वाचा ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर’ म्हणून उदयास येत आहे,” असे त्यांनी सांगितले.

ईव्ही आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राचे ऑटोमोबाईल क्षेत्र आता ‘नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी’मध्ये रूपांतरित होत आहे. देशातील २० टक्के ऑटोमोबाईल आणि ईव्ही उत्पादन महाराष्ट्रात होत असून राज्य एआय, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आणि डीप-टेक क्षेत्रातही मोठी झेप घेत आहे.

“भविष्यातील आर्थिक नेतृत्व हे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्यांकडेच असेल आणि महाराष्ट्राला जागतिक बौद्धिक संपदा निर्माण करणारे राज्य बनवण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0