चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाखोंची गर्दी; “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
मुंबईतील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाखो अनुयायांनी अभिवादन केले. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आणि प्रशासनाची चोख व्यवस्था पाहायला मिळाली.
मुंबई | प्रतिनिधी : उदय कासारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच अनुयायांची मोठी गर्दी उसळली असून संपूर्ण परिसर “जय भीम” च्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विविध सामाजिक, राजकीय तसेच बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स तसेच आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
याशिवाय, डॉ. आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ येथेही अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. देशासह जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात साजरी केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0