सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य करण्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Apr 6, 2026 - 04:07
 0  20
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nashik-Kumbh

श्रीमती माधुरी अनिल वैद्य - नाशिक ब्यूरो

सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नाशिक येथे अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिर येथे झालेल्या या बैठकीत देशभरातील संत, महंत आणि विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा भव्य आणि दिव्य करण्यासाठी सर्व स्तरांवर नियोजन सुरू आहे. भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साधू-संतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोदावरी नदी स्वच्छ व प्रवाही ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत असून, त्र्यंबकेश्वर येथे नदीचा प्रवाह बारमाही राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुशावर्त कुंड येथे जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे.

याशिवाय त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक परिक्रमा मार्ग, रेल्वे स्थानकातील सुविधा वाढविणे, घाटांची संख्या आणि लांबी वाढविणे, जुन्या मंदिरांचे संवर्धन, मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण तसेच ओझर विमानतळ विस्तारीकरण यांसारखी कामे प्रगतीपथावर आहेत. साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहण करून तेथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी प्रयागराज येथे अभ्यास दौरा केला आहे. यंदा मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत दहा पट अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यानुसार तयारी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कुंभमेळा हा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा असून तो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या सोहळ्यात केवळ स्नान नव्हे, तर विचारांचे आदान-प्रदान आणि संस्कृतीचे जतन होते.

तसेच महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे समाजातील गैरप्रकारांना आळा बसेल आणि भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

What's Your Reaction?

Like Like 7
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0