सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; मच्छीमार युवकांना सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वर्सोवा, मुंबई येथे ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 18 ते 35 वयोगटातील पात्र मच्छीमार युवकांनी 19 जून 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत.

Jun 4, 2026 - 20:12
 0  25
सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; मच्छीमार युवकांना सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण
सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. ४ जून: राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 136 व्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून इच्छुक मच्छीमार युवकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या प्रशिक्षणामध्ये नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनची देखभाल व दुरुस्ती, आधुनिक मासेमारी साधनांचा वापर तसेच सुरक्षित मासेमारीसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञानाचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 असा असून दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रतिमहिना 100 रुपये तर इतर प्रशिक्षणार्थ्यांकडून 450 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी उमेदवार हा कार्यशील मच्छीमार, शारीरिकदृष्ट्या सुदृढ, वय 18 ते 35 वर्षे, पोहता येणारा, किमान चौथी उत्तीर्ण आणि मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असलेला असणे आवश्यक आहे. तसेच आधारकार्ड किंवा बायोमेट्रिक ओळखपत्र आणि संबंधित मच्छीमार संस्थेची शिफारस आवश्यक राहील.

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज 19 जून 2026 पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई – 61 येथे सादर करावेत.

अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी विजय कोळगे (मो. 8779839743) किंवा यांत्रिकी निर्देशक जयहिंद सुर्यवंशी (मो. 7507988552) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे किनारपट्टी भागातील युवकांना तांत्रिक कौशल्य प्राप्त होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित नौकानयन आणि इंजिन देखभालीचे प्रशिक्षण मिळाल्याने मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक होण्यास मदत होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 6
Dislike Dislike 0
Love Love 3
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 3
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.