भारत विश्वगुरू होण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे : प्रभाकर वर्तक
‘टेक वारी 2.0-महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत आयोजित ‘इथिक्स इन गर्व्हनन्स’ सत्रात यशदाचे प्रशिक्षक प्रभाकर वर्तक यांनी प्रशासनातील नैतिकता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, दि. ७ मे २०२६ : भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून नैतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगती देखील आवश्यक आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी हे राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन यशदाचे प्रशिक्षक प्रभाकर वर्तक यांनी केले.
मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक वारी 2.0 - महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘इथिक्स इन गर्व्हनन्स’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते. यावेळी सहसचिव बडगेरी यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रभाकर वर्तक यांनी सांगितले की, समाजात प्रेम, बंधुता, नैतिकता आणि विश्वकल्याणाला अत्यंत महत्त्व आहे. या मूल्यांचा प्रशासनात योग्य वापर केल्यास समाजाचे कल्याण शक्य होते. “प्रशासनात सक्षम, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले अधिकारी देशाच्या विकासाला गती देतात. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी आहे, यामागे अधिकाऱ्यांची प्रामाणिक आणि नैतिक कार्यपद्धती कारणीभूत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, प्रशासनात पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करणे काळाची गरज आहे. “भ्रष्टाचार हा विकासातील मोठा अडथळा आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास जनतेचा शासनावरील विश्वास वाढतो आणि विकासकामांना वेग मिळतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दुर्बल, पीडित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देणे हे प्रशासनाचे मोठे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्त्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. बुद्धांच्या विचारांचा उल्लेख करताना त्यांनी “दुसऱ्याची सुश्रुषा करा” या तत्त्वाची आजच्या काळात विशेष गरज असल्याचे सांगितले.
प्रशासनात काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता, जबाबदारी, निष्पक्षता, सेवाभाव आणि कायद्याचे पालन या मूल्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे वर्तक यांनी अधोरेखित केले. “संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट नाही. अनेक अधिकारी कोणतीही लाच न घेता पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतात. अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी प्रशासनातील सकारात्मक कामांची विविध उदाहरणे देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संत, कवी आणि समाजसुधारकांच्या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0