महाराष्ट्र दिनीच मानधन न मिळाल्याने लोककलावंतावर घर सोडण्याची वेळ; कलाकाराची व्यथा समोर
महाराष्ट्र शासनाच्या योजनांच्या प्रचारासाठी पथनाट्य सादर करणाऱ्या लोककलावंत अनिल शिंदे यांना मानधन न मिळाल्याने महाराष्ट्र दिनीच भाड्याचे घर सोडावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलाकार आपल्या कलेच्या जोरावर नाव कमावण्यासाठी आणि कामाच्या शोधात मुंबईत येतात. काहींना यश मिळते, तर काहींना संघर्षाचा सामना करावा लागतो. मात्र काम करूनही मेहनताना न मिळणे, ही कलाकारांसाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरते.
अशीच वेदनादायी घटना लोककलावंत अनिल बाबुराव शिंदे यांच्या बाबतीत समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पथनाट्य सादर केले होते. हे काम महाराष्ट्र शासन आणि स्टारटेगो कम्युनिकेशन मीडिया हब यांच्या माध्यमातून देण्यात आले होते.
50 टक्के मानधनाचे आश्वासन, पण पैसेच नाहीत
अनिल शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, पथनाट्य सुरू होण्यापूर्वी 50 टक्के मानधन दिले जाईल, तसेच उर्वरित रक्कम 40 शो पूर्ण झाल्यानंतर दिली जाईल, असे सांगण्यात आले होते.
मात्र दोन महिने उलटून गेले तरी आजपर्यंत मानधन मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र दिनीच घर सोडावे लागले
मानधन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून महाराष्ट्र दिनीच भाड्याचे घर सोडण्याची वेळ आपल्यावर आल्याचे अनिल शिंदे यांनी सांगितले.
वेळेवर पैसे मिळाले असते तर घरभाडे भरता आले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप
मानधनासाठी अनिल शिंदे हे देवेन बच्छाव, संजय सदगीर आणि शशिकांत शिगवण यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र सर्वांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कलाकाराचा संतप्त सवाल
“जर मानधन द्यायचंच नव्हतं, तर आम्हाला काम का दिलं? आमच्या भावनांशी का खेळलं? आम्ही कलाकारांनी अशीच भीक मागायची का?” असा संतप्त सवाल अनिल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज
या घटनेमुळे कलाकारांच्या मेहनतीचा योग्य मोबदला, वेळेवर मानधन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0