नाशिकमध्ये संस्कृतसह एआय व डेटा सायन्सचा देशातील पहिलाच अभ्यासक्रम; प्रो. निलाभ तिवारी यांची माहिती

नाशिक येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या नव्या कॅम्पसमध्ये संस्कृतसह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्सचा देशातील पहिलाच अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे संस्कृत आणि वैदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात नवी दालने खुली होणार असल्याचे प्रो. निलाभ तिवारी यांनी सांगितले.

Jun 1, 2026 - 20:48
 0  111
नाशिकमध्ये संस्कृतसह एआय व डेटा सायन्सचा देशातील पहिलाच अभ्यासक्रम; प्रो. निलाभ तिवारी यांची माहिती
नाशिक एआय अभ्यासक्रम, संस्कृत आणि एआय, डेटा सायन्स

नाशिक ब्यूरो:

नाशिक : संस्कृत आणि वैदिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकमध्ये एक ऐतिहासिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला आहे. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय च्या नव्या कॅम्पसमध्ये ‘संस्कृतसह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्स’ हा देशातील पहिलाच अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान, भाषाशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास प्रो. निलाभ तिवारी यांनी व्यक्त केला.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पंचवटी केंद्राच्या वतीने आयोजित ‘५१ सहस्र तुलसी दलार्चन’ आणि अभिषेक सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अधिक पुरुषोत्तम मास, एकादशी पर्वकाळ आणि व्यतिपात योगाच्या मुहूर्तावर हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. यामध्ये ५१ जोडप्यांनी सपत्नीक पूजा व अभिषेक केला. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैदिक मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रो. तिवारी यांनी सांगितले की, आपल्या पूर्वजांनी अनेक पिढ्यांपर्यंत वेद मुखोद्गत करून श्रुती परंपरा जिवंत ठेवली. या परंपरेच्या जतनासाठी त्यांनी मोठे त्याग आणि बलिदान दिले. आज आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरी आपल्या कुटुंबाचा वेद आणि संस्कृतशी असलेला संबंध जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

"नाशिकमधील हा नवीन कॅम्पस शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा तुरा ठरत आहे. संस्कृत आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देईल," असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश प्रभुणे महाराज उपस्थित होते. यावेळी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे पंचवटी केंद्रप्रमुख वेदाचार्य रवींद्र पैठणे, कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, कार्यवाह ॲड. सुहास भणगे, कोषाध्यक्ष उल्हास पंचाक्षरी आणि प्रदीप भानुवंशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सन्मान

याप्रसंगी समाजकार्यात आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पौर्णिमा मंडलिक, प्रो. निलाभ तिवारी, ओम प्रकाश शर्मा, मुकुंद कुलकर्णी, डॉ. रमेश भट, जयदीप वैशंपायन, जयप्रकाश पाठक, सुनील पिंपळे, बाळासाहेब पाठक, नीरज तिवारी आणि प्रसाद धोपावकर यांचा समावेश होता.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0