कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कारासाठी शिफारस; राज्य सरकारकडून गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देण्याचा प्रयत्न – मंत्री जयकुमार रावल

राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून दूर राहून समाजहितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. पद्म पुरस्कार २०२७ साठी राज्यस्तरीय शिफारस समितीच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला.

May 27, 2026 - 00:32
 0  1
कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कारासाठी शिफारस; राज्य सरकारकडून गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देण्याचा प्रयत्न – मंत्री जयकुमार रावल
पद्म पुरस्कार २०२७, जयकुमार रावल, महाराष्ट्र शासन

मुंबई, दि. २६ : राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून दूर राहून समाजहितासाठी सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. अशा असामान्य आणि प्रेरणादायी व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पद्म पुरस्कार २०२७ साठी राज्यस्तरीय शिफारस समितीची आढावा बैठक आज मंत्रालयात मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे उपस्थित होते.

यावेळी मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना पद्म पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

ते म्हणाले की, पुरस्कारांसाठी शिफारस करताना केवळ प्रसिद्धी किंवा लोकप्रियतेपेक्षा संबंधित व्यक्तीचे समाजासाठीचे प्रत्यक्ष योगदान, कार्यातील सातत्य, निस्वार्थ सेवा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व यांना अधिक महत्त्व दिले जाईल.

पद्म पुरस्कारांचा दर्जा आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी खऱ्या अर्थाने समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचीच निवड होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, विज्ञान, कृषी, उद्योग, पर्यावरण, लोकसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी सर्वंकष छाननी प्रक्रिया राबवून अंतिम शिफारसी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

विविध क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण, समाजाभिमुख आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळावा, यासाठी पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने शिफारस प्रक्रिया राबविण्याबाबत समिती सदस्यांनीही आपली मते मांडली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थापन करण्यात आलेली राज्यस्तरीय समिती विविध प्रस्तावांचा अभ्यास करून अंतिम शिफारसी निश्चित करणार आहे.

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक पात्र आणि गुणवंत व्यक्तींना स्थान मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0