पत्रकारितेतील बदल स्वीकारताना मूल्यांची जपणूक गरजेची – डॉ. सुकृत खांडेकर

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सुकृत खांडेकर यांनी पत्रकारितेतील बदल, नवमाध्यमांची आव्हाने आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेची गरज यावर मार्गदर्शन केले. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण आणि ‘गरवारे दर्पण’ वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.

Apr 29, 2026 - 14:44
 0  15
पत्रकारितेतील बदल स्वीकारताना मूल्यांची जपणूक गरजेची – डॉ. सुकृत खांडेकर
डॉ. सुकृत खांडेकर, पत्रकारिता, मुंबई विद्यापीठ

मुंबई प्रतिनिधी: पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना नव्या संधी निर्माण होत आहेत. मात्र या बदलांचा स्वीकार करताना पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक आणि जबाबदारीची जाणीव तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. सुकृत खांडेकर यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्था, मराठी पत्रकारिता वर्ग आणि अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. वि. गोखले जयंती स्मृती व्याख्यान, ‘गरवारे दर्पण’ वार्षिकांक प्रकाशन सोहळा तसेच राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २४ एप्रिल रोजी संस्थेच्या प्रेक्षागृहात पार पडला.

डॉ. खांडेकर यांनी पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या ५४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना अनुभवातून मार्गदर्शन केले. त्यांनी युद्ध पत्रकार दि. वि. गोखले, डॉ. अरुण टिकेकर आणि विद्याधर गोखले यांसारख्या दिग्गज संपादकांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी पत्रकारिता वर्गाच्या समन्वयक व संयोजक नम्रता कडू यांनी वर्गाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला. गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेचे संचालक डॉ. केयूर कुमार नायक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांत कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख, लोकमंगल प्रकाशनचे संदीप कुलकर्णी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत, आकाशवाणी पुणे केंद्राचे माजी संचालक व वर्गाचे मार्गदर्शक नितीन केळकर, मृदुला राजवाडे, उमेश घळसासी, शैलेश कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी ‘नव माध्यमे – नव्या संधी, नवी आव्हाने’ या संकल्पनेवर आधारित ‘गरवारे दर्पण’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मराठी पत्रकारिता वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

पुरस्कार वितरण

या वर्षीचा दि. वि. गोखले पुरस्कार सुवर्णपदक विजेते डॉ. संदीप वरकुटे यांना प्रदान करण्यात आला. विद्याधर गोखले पुरस्कार विशाल सवने यांना, तर डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार महिला पत्रकार शर्वरी जोशी-सावंत यांना देण्यात आला.

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे निकाल

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत अद्वैत अविनाश सोवळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मराठी भाषेचे बदलते स्वरूप’ या विषयावरील लेखासाठी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक शैला गेडाम यांना मिळाला. तृतीय क्रमांक ज्योती हलगेकर-जाधव आणि डॉ. योगेंद्र शेळके यांनी विभागून मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रीती थोरात आणि विजय कामत यांना प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनिशा डुंबरे हिने केले, तर आभार प्रदर्शन अशिती जोईल हिने केले. आजी-माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0