राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियान

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकारातून आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानाला २६ मेपासून प्रारंभ होणार आहे.

May 25, 2026 - 21:36
 0  2
राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियान
टीबीमुक्त मुंबई, क्षयरोग मोहीम, जिष्णु देव वर्मा,

मुंबई, दि. २५ : क्षयरोगमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकभवनाच्या पुढाकारातून आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियान मंगळवार (दि. २६ मे) पासून सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत धारावी आणि सायन येथे होणार आहे.

मंगळवारी सकाळी ११ वाजता धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे अभियानाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ होणार असून त्यानंतर सकाळी ११.३० वाजता सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे उपस्थित राहणार आहेत.

अभियानांतर्गत राज्यपालांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप देखील करण्यात येणार आहे. क्षयरोगाविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी जनजागृती, उपचार व्यवस्थेला चालना आणि रुग्णांना आवश्यक पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या मोहिमेचा भर राहणार आहे.

‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानाच्या माध्यमातून महानगरातील क्षयरोग नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0