युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद

एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘युवा संगम’ कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधत जबाबदारी, शिस्त, सामाजिक सहभाग आणि कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

Jun 9, 2026 - 18:42
 0  3
युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद
युवा संगम’ कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई, दि. ८ : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा संगम’ कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांना जबाबदारी, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

लोकभवन, मुंबई येथे सोमवारी (दि. ८) झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER) पुणे तर्फे करण्यात आले होते. ‘युवा संगम’ हा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग असून विविध राज्यांतील युवकांना एकमेकांच्या संस्कृती, परंपरा आणि विकास प्रक्रियेची ओळख करून देण्याचा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.

यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना विविधतेचा स्वीकार करण्याचे, शिस्तबद्ध जीवन जगण्याचे आणि कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चिकाटी व समर्पण आवश्यक असल्याचे सांगितले. व्यावसायिक यशासोबतच सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

राज्यपालांनी शिक्षण सुधारणा, कौशल्य विकास, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगती या विषयांवरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीने ज्ञान, कौशल्य आणि सामाजिक मूल्यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव श्रेयांश मोहन, आयसर पुणेच्या प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. मनवा दिवेकर, वरिष्ठ प्रधान तांत्रिक अधिकारी डॉ. शांती कलीपटनपू, भारतीय तंत्रज्ञान संस्था तिरुपती (IIT Tirupati) येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. बिभूती कच्छप, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. रामामूर्ती, प्रकल्प व्यवस्थापक नितीन तिवाणे तसेच आंध्रप्रदेशातील विद्यार्थी प्रतिनिधी, आयसरचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राज्यपालांनी शिक्षण मंत्रालय, आयोजक संस्था आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0